
बारामतीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढत रंगणार आहे. बारामतीतल्या सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सुनेत्रा पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशी लढत रंगणार असल्याची माहिती समोर आली आहे. सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत स्वतंत्र पॅनल देण्याची युगेंद्र पवारांनी घोषणा केली आहे. याआधी भाऊकी-गावकी गट तट बाजूला ठेवून एकजुटीने पुढे जाण्याचे आवाहन सुनेत्रा पवारांनी केले होते. आता युगेंद्र पवार लवकरच उमेदवारांच्या मुलाखतीला सुरुवात करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
बारामतीत पुन्हा पवार विरुद्ध पवार सामना
सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखालील पॅनेलसमोर युगेंद्र पवार यांच्या स्वतंत्र पॅनेलचे आव्हान असणार आहे. त्यामुळे सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीत पवार कुटुंबाच्या विचारधारेशी संबंधित दोन गट आमनेसामने येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. युगेंद्र पवार यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देत स्वतंत्र पॅनलच्या माध्यमातून निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत. शेतकरी सभासदांसाठी सक्षम पर्याय उभा करण्याच्या उद्देशाने आपण निवडणुकीत उतरत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पवार विरुद्ध पवार राजकारणात आम्हाला रस नाही – युगेंद्र पवार
युगेंद्र पवार यांनी म्हटले की, ‘आम्हाला पवार विरुद्ध पवार असे करण्यात रस नाही. कुणाच्या विरोधात लढण्यापेक्षा शेतकरी सभासदांसाठी सक्षम पर्याय उभा राहावा, म्हणून आम्ही लढत आहोत. सुनेत्रा काकींबद्दल आमचा आक्षेप नाही, परंतु सोमेश्वरच्या संचालकांबद्दल आमचा आक्षेप आहे. यंदा बदल गरजेचा आहे.’ युगेंद्र पवार यांच्या या भूमिकेमुळे सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत चुरस वाढण्याची चिन्हे आहेत.
बारामतीत याआधीही पवार विरुद्ध पवार सामना
बारामतीत पवार कुटुंबातील राजकीय संघर्ष याआधीही पाहायला मिळाला आहे. लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यात थेट लढत झाली होती. या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांनी विजय मिळवत बारामतीची जागा कायम राखली होती. त्यानंतर विधानसभा निवडणुकीतही बारामतीत पवार विरुद्ध पवार सामना रंगला. अजित पवार यांच्याविरोधात युगेंद्र पवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. या लढतीत अजित पवार यांनी दणदणीत विजय मिळवला होता.
Leave a Reply