
हिंदी सिनेमात प्रत्येक भावनेसाठी एखादं खास गाणं पाहायला मिळतं. आनंद असो, दुःख असो, प्रेम असो किंवा विरह… प्रत्येक प्रसंगाला साजेसं गाणं हिंदी चित्रपटसृष्टीने दिलं आहे. विशेष म्हणजे अनेक दशकांपूर्वीची ही गाणी आजही तितकीच लोकप्रिय आहेत. जणू ही गाणी एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे भावनांची सुंदर परंपरा म्हणून पोहोचत आहेत.
अशाच अजरामर गाण्यांपैकी एक म्हणजे यश चोप्रा यांच्या 1976 साली प्रदर्शित झालेल्या ‘कभी कभी’ चित्रपटातील ‘मेरे घर आयी एक नन्हीं परी’. लेकीच्या जन्माचा आनंद व्यक्त करण्यासाठी आजही अनेक घरांमध्ये हे गाणं आवर्जून ऐकलं जातं. मुलीला पहिल्यांदा कुशीत घेताना किंवा तिच्या जन्माचा आनंद साजरा करताना हे गाणं आई-वडिलांच्या भावना अधिकच सुंदर करून जातं.
लता मंगेशकर यांच्या स्वरांनी सजलं गाणं
‘मेरे घर आयी एक नन्हीं परी’ या गाण्याला महान गायिका लता मंगेशकर यांनी आपला मधुर आवाज दिला आहे. या गाण्याचे शब्द ज्येष्ठ गीतकार साहिर लुधियानवी यांनी लिहिले असून, संगीतकार खय्याम यांच्या संगीताने या गाण्याला अजरामर केलं.
गाण्यात नवजात मुलीचं वर्णन ‘नन्हीं परी’ म्हणजेच छोट्या परीप्रमाणे करण्यात आलं आहे. तिच्या गोड बोलांची तुलना मधाशी, सुगंधाची तुलना अत्तराशी, तर ओठांची तुलना गुलाबाशी केली आहे. तिच्या आगमनाचं हे काव्यात्मक वर्णन प्रत्येक आई-वडिलांच्या मनाला स्पर्शून जातं.
चित्रपटातील या प्रसंगात वहीदा रहमान यांनी साकारलेली अंजली आपल्या मुलगी पिंकीसोबत दिसते. आई आणि मुलीमधील नाजूक नातं या गाण्यातून अतिशय सुंदरपणे मांडण्यात आलं आहे. त्यामुळे हे गाणं केवळ आनंदाचं गाणं न राहता आईच्या ममतेचं प्रतीकही बनलं.
आजही का आहे या गाण्याची क्रेझ?
खय्याम यांचं मधुर संगीत, लता मंगेशकर यांचा गोड आवाज आणि साहिर लुधियानवी यांच्या भावस्पर्शी शब्दांचा सुरेख संगम ‘मेरे घर आयी एक नन्हीं परी’ या गाण्यात पाहायला मिळतो. त्यामुळे हे गाणं काळाच्या पुढे जाऊन आजही लोकप्रिय आहे.
विशेष म्हणजे लेकीच्या जन्माच्या आनंदाशी या गाण्याचं नातं इतकं घट्ट झालं आहे की, आजही मुलगी जन्माला आल्यानंतर अनेक कुटुंबांमध्ये हे गाणं आवर्जून वाजवलं जातं. काहींसाठी तर हे गाणं लेकीच्या स्वागताचं गीतच बनलं आहे.
Leave a Reply