
Crime Patrol: ‘क्राईम पेट्रोल’ ही मालिका गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेत खऱ्या आयुष्यात घडलेल्या गुन्हेगारी कथा दाखवल्या जातात. काही घटना इतक्या क्रूर आणि निर्घृण असतात, ज्यामुळे अंगावर अक्षरश: काटा येतो. या मालिकेला जवळपास 25 वर्षे पूर्ण झाली आहेत. तरीसुद्धा आजही प्रेक्षकांमध्ये ‘क्राइम पेट्रोल’ची प्रचंड क्रेझ आहे. या मालिकेचं सूत्रसंचालन आजवर अनेक सेलिब्रिटींनी केलं आहे. संपूर्ण देशाला हादरवणाऱ्या घटनांवर यातील एपिसोड्स चित्रित झाले. अशाच एका घटनेवर ‘क्राइम पेट्रोल’चा एपिसोड शूट करण्यात आला होता. मात्र या एपिसोडवर वर्षभरापर्यंत बंदी घालण्यात आली होती. या मालिकेचे दिग्दर्शक अमित कुमार झा यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्या एपिसोडविषयी अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या क्वचितच कोणाला माहीत असतील.
एपिसोडमध्ये असं काय होतं?
‘एनडीटीव्ही’शी बोलताना अमित म्हणाले, “एकेकाळी आम्ही खऱ्या लोकेशन्सवर या मालिकेचं शूटिंग करायचो. त्यावेळी फिल्मी सेट्स, मोठमोठे लाइट्स वगैरे काहीचं नव्हतं. आम्ही छोट्या बल्बच्या प्रकाशात शूटिंग करायचो. क्राइम पेट्रोलचे किती सिझन्स शूट केले, हे मला स्वत:लाही लक्षात नाही. इतकं नक्की म्हणू शकतो की, आजच्या काळात जे लोक प्रोजेक्ट्सचं दिग्दर्शन करत आहेत, ते सर्वजण एकेकाळी माझे सहाय्यक दिग्दर्शक होते. जेव्हा मी क्राइम पेट्रोलचं शूटिंग करत होतो, तेव्हा शोचा टीआरपी खूपच कमी होता. जेव्हा दिल्लीत निर्भया प्रकरण घडलं, तेव्हा संपूर्ण देश हादरला होता. इतिहासात पहिल्यांदाच सोनी टीव्हीवर निर्भया प्रकरणावर आधारित एक एपिसोड बनला होता. या एपिसोडवर वर्षभरापर्यंत बंदी होती. सरकारने तो एपिसोड चालवण्यास नकार दिला होता. या एपिसोडमुळे देशात दंगली होतील, अशी सरकारला भीती होती. म्हणूनच त्यांनी तो एपिसोड टेलिकास्ट करण्यापासून रोखलं होतं”
शूटिंगदरम्यान अनेक अडथळे
निर्भया प्रकरणावरील एपिसोड शूट करताना अनेक समस्यांचाही सामना करावा लागल्याचा खुलासा दिग्दर्शकांनी केला. “ज्या अभिनेत्रीला आम्ही निवडलं होतं, ती ढसाढसा रडू लागली होती. शूटिंगदरम्यान तिला त्या सीन्सचा खूप त्रास झाला होता. खऱ्या निर्भयाने ते सर्व कसं सहन केलं असेल, याचा विचार करा. त्या एका एपिसोडसाठी आम्ही सर्व नवीन कलाकारांची निवड केली होती. आमच्यासाठी हे खूप मोठं आव्हान होतं आणि त्याचे परिणामसुद्धा आम्हाला भोगावे लागले होते. ज्या बसमध्ये शूटिंग सुरू होतं, ती एका खोल खड्ड्यात अडकली होती. अखेर एका वर्षानंतर तो एपिसोड टीव्हीवर प्रसारित झाला”, असं त्यांनी पुढे सांगितलं. वर्षभरानंतर जेव्हा हा एपिसोड प्रसारित झाला, तेव्हा ‘क्राइम पेट्रोल’चा टीआरपी सर्वाधिक होता.
Leave a Reply