
मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आज नववा दिवस आहे. जरांगे पाटील यांनी उपचार घेण्यास स्पष्टपणे नकार दिला असून, वैद्यकीय पथकालाही दोनदा परत पाठवले आहे. परवा रात्रीपासून त्यांनी उपचार आणि पाणी घेणे बंद केले आहे. यामुळे त्यांची प्रकृती खालावली आहे. अंतरवलीमध्ये मराठा आंदोलकांची मोठी गर्दी झाली आहे. सरकारच्या शिष्टमंडळासोबतच्या भेटीनंतर जरांगे पाटलांनी काही काळ उपचार घेतले होते. मात्र, सरकारने अद्याप कोणताही ठोस निर्णय जाहीर न केल्याने, जोपर्यंत प्रत्यक्ष अंमलबजावणी आणि शासन निर्णय होत नाही, तोपर्यंत उपोषण थांबणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. “तुमचे पाणीही नको, तपासण्या नको, सलाईन नको आणि उपचारही नको,” असे जरांगे पाटलांनी म्हटले आहे.
दुसरीकडे, शासनाने त्यांच्या मागण्यांची दखल घेतली असून, काही मागण्यांची पूर्तता झाली आहे, तर काही कायदेशीर बाबींवर कार्यवाही सुरू असल्याचे म्हटले आहे. सरकारने जरांगे पाटलांना उपचार सुरू ठेवण्याचे आवाहनही केले आहे, जेणेकरून कोणताही अनपेक्षित पाऊल उचलले जाऊ नये.
Leave a Reply