
देशाचा विकास वृद्धी दर (GDP) 7.8 झाल्याचा सरकारचा दावा आहे. तर विरोधकांनी त्यावरून सरकारला खडे बोल सुनावले आहे. ही आकडेवारी भुलथापा असल्याचा विरोधकांचा दावा आहे. देशात महागाईने उच्चांक गाठला आहे असा आरोप त्यांनी केला आहे. हाच धागा पकडत आजच्या पत्रकार परिषदेत खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदी यांना एक अजब ऑफर दिली आहे. महागाईची सर्वसामान्यांना किती झळ बसते हे पाहण्यासाठी मोदींनी मुंबईच्या बाजारात यावं असं आवाहन त्यांनी केलं आहे. काय म्हणाले राऊत?
राऊतांची पंतप्रधानांना मोठी ऑफर
देशाच्या विकास वृद्धी दरावरून, GDP वरून त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. महागाईची काय स्थिती आहे असा सवाल करत मोदी यांनी भांडूपच्या बाजारात, दादरच्या फुलमार्केटमध्ये यावं, एक फिश मार्केट आहे, तिथं यावं असे आवाहन त्यांनी केलं. त्यांनी पिशवी घेऊन यावं पैसे माझ्या खिशात ठेवलेले आहे. त्यांनी सांगत जावं, त्यांना काय हवं आहे ते, मी पैसे देत जाईल. मोदी हे खोटारडे व्यक्ती आहे. त्यांची पदावरून जाण्याची वेळ आलेली आहे. महागाईचा उच्चांक झाला आहे. सामान्य माणूस कसा जगतो आहे हे जर देशाच्या पंतप्रधानांना माहिती नसेल तर त्यांनी या देशात राहू नये. परदेश दौऱ्यावर जावं, असा टोला ही राऊतांनी लगावला.
शेतकरी प्रश्नावरून निशाणा
सरसंघचालक अमेरिका आणि लंडनमध्ये ही भाषा वापरतात की मुसलमान आणि हिंदूंमध्ये सामाजिक, सांस्कृतिक सलोखा राहिला पाहिजे, अशा प्रकारची भाषा ते न्यूयॉर्क येथे जाऊन करतात. तर इथे त्यांची पिलावळ ही वेगळी भाषा करते. यामुळे हे जे ढोंग आहे. 2029 च्या निवडणुकीपूर्वी त्यांना मतांचे ध्रुवीकरण करायचं आहे. त्यासाठी हे सगळे खेळ सुरू आहेत. महागाई वाढलेली नाहीत असे ते म्हणतायेत. देशात गेल्या दोन वर्षात सात हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत हे मी वारंवार सांगत आहे. सर्वाधिक महाराष्ट्र, विदर्भात आत्महत्या झाल्या आहेत. काल अजून पाच शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचा उल्लेख तुम्ही करत आहात. देवेंद्र फडणवीस यांनी काही काळ आत्मचिंतन केलं पाहिजे केदारनाथच्या गुफेत जाऊन. त्यांनी खोटेपणा बाहेर काढला पाहिजे. उद्या सत्ता बदलल्यावर गुलाबराव पाटील हे पहिले उडी मारणारे असतील असा टोलाही राऊतांनी लगावला. सुप्रीम कोर्टाचा निकाल लागल्यावर तुम्हाला चित्र स्पष्ट होईल असे राऊत म्हणाले. त्यांनी पाटील यांच्यावर अधिक काही बोलण्यास नकार दिला.
Leave a Reply