
नाशिकमध्ये मुख्यमंत्री मोटारीने आले म्हणून शहरातील सर्व खड्डे तातडीने बुजवण्यात आले, अशी मिश्किल टोलेबाजी मंत्री छगन भुजबळ यांनी केली. पुणे विद्यापीठाच्या उपकेंद्राच्या प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमावेळी ते बोलत होते. भुजबळ म्हणाले, “मुख्यमंत्री मोटारीने आले म्हणून नाशकातले सगळे खड्डे बुजवले गेले. त्यामुळे दर महिन्याला काहीतरी कार्यक्रम ठेवा म्हणजे मुख्यमंत्री मोटारीने नाशकात येतील आणि सगळे खड्डे बुजवले जातील.” त्यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानताना नमूद केले की, मुंबईहून नाशिकला येताना रस्त्याचे काम चांगले चालले होते आणि नेहमीपेक्षा लवकर पोहोचता आले. या कार्यक्रमाला पालकमंत्री गिरीश महाजन देखील उपस्थित होते. भुजबळ यांनी समृद्धी मार्ग चांगला असला तरी, भिवंडी बायपासवर लोकांना दोन-तीन तास लागतात या समस्येकडेही लक्ष वेधले. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे रस्त्यांची दुरुस्ती होते, यावर त्यांनी कटाक्ष टाकला.
Leave a Reply