
इराण समर्थित हुती बंडखोरांकडून धोका असतानाही अनेक जहाजांची बाबा अल-मंडेब स्ट्रेटमधून जल वाहतूक सुरु आहे. न्यूयॉर्क टाइम्सच्या शिपिंग डेटा विश्लेषणातून ही माहिती समोर आली आहे. समुद्रातून जलवाहतूक करताना सुरक्षेची पूर्ण खात्री नसल्याने अनेक जहाजांना आपला मार्ग बदलावा लागतोय. प्रवास पूर्ण करण्याआधीच यू-टर्न घ्यावा लागत आहे असं रिपोर्टमधून समोर आलं आहे. मागच्या आठवड्यात हूती बंडखोरांनी कमीत कमी तीन तेल टँकर्सना टार्गेट केलं होतं. यात सर्वात मोठा हल्ला शुक्रवारी झाला होता. लाल समुद्रात जलवाहतुकीत वारंवार अडथळे आले, तर तो जागतिक व्यापारासाठी मोठा झटका ठरेल. मध्य पूर्वेतील वाढत्या संघर्षाचा परिणाम लाल समुद्रात दिसून येतोय. अमेरिका आणि इराणमध्ये सुरु असलेल्या युद्धाचा हा पाचवा महिना आहे. यामुळे स्ट्रेट ऑफ हॉर्मुजमधील जल वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. हा एक महत्वाचा समुद्री मार्ग आहे. जवळपास 20 टक्के जागतिक तेल वाहतूक या मार्गावरुन होते.
मिडिल ईस्टमधील तणाव आणि हल्ल्याच्या शक्यतेमुळे सौदी अरेबिया दररोज लाखो बॅरल कच्चं तेल जमिनीच्या पाइपलाइन मार्गे पाठवत आहे. फारस खाडीला ही पाइपलाइन जाऊन मिळते. हे कच्चं तेल नंतर बाब-अल-मंडेब स्ट्रेट मार्गे पाठवलं जातं. या मार्गावरील एका अरुंद पण महत्वाच्या पट्ट्यावर हुती बंडखोरांचं नियंत्रण आहे. स्ट्रेट ऑफ हॉर्मुज मध्ये धोका असल्याने बाब-अल-मंडेब स्ट्रेट मार्गे जहाजांची जलवाहतूक सुरु असते.
43 जहाजांनी बाब अल-मंडेब पार केलं
समुद्र जलवाहतुकीची ट्रॅकिंग करणारी कंपनी Kpler च्या ट्रॅकिंग डेटानुसार,जवळपास 10 पेक्षा जास्त जहाजं मागे फिरली किंवा या स्ट्रेट मधून जाणं टाळलं. Kplerच्या डेटानुसार गुरुवारी 43 जहाजांनी बाब अल-मंडेब पार केलं. बुधवारी 35 जहाजं या मार्गावरुन गेली होती. नुकताच हौती बंडखोरांनी सौदीच्या तेल टँकरवर हल्ला केला. शुक्रवारी लाल सागरात सौदी संबंधी एका जहाजाला टार्गेट करण्यात आलं. यात किरकोळ नुकसान झाल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. पण जहाजाने पुढे मार्गक्रमण सुरुच ठेवलं.
Leave a Reply