
राज्यातील सण आणि उत्सवांना सुरूवात झाली आहे. गणेशोत्सवाला काही दिवसांनी सुरूवात होणार आहे, त्यानंतर नवरात्री, दसरा आणि दिवाळी हे सण असणार आहेत. या सणासुदीच्या काळात मिठाई, खाद्यपदार्थ आणि विविध अन्नपदार्थांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. या काळात अन्नपदार्थांमध्ये भेसळ होण्याची शक्यता लक्षात घेऊन अन्न व औषध प्रशासनाकडून (FDA) विशेष तयारी करण्यात येत आहे. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या माध्यमातून सणासुदीच्या काळातील अन्नसुरक्षेसाठी विशेष नियमावली तयार करण्यात येणार आहे.
अन्न व औषध प्रशासनाकडून तयार करण्यात येणाऱ्या या विशेष नियमावलीमध्ये केवळ एखाद्या एका सणाचा विचार न करता वर्षभरातील सर्व धर्मांच्या प्रमुख सणांचा समावेश करण्यात येणार आहे. पुढील एक-दोन दिवसांत यासंदर्भातील विशेष आदेश जारी होण्याची शक्यता आहे. यंदा प्रथमच वर्षभरातील सणांचे स्वतंत्र कॅलेंडर तयार करून त्यानुसार FDAच्या कारवाईचे नियोजन करण्यात येणार आहे.
सणापूर्वी, सणादरम्यान आणि सणानंतर कारवाई
या कॅलेंडरमध्ये ख्रिसमस, दिवाळी, ईद यांसह विविध धर्मीय सणांचा समावेश केला जाणार आहे. प्रत्येक सणासाठी स्वतंत्र टाइमलाइन निश्चित केली जाणार असून, सणापूर्वी, सणादरम्यान आणि सणानंतर अशा तीन टप्प्यांत अन्नपदार्थांची तपासणी आणि कारवाई करण्याचे नियोजन केले जाणार आहे.
सणासुदीच्या काळात मोठ्या प्रमाणात मिठाई, दुग्धजन्य पदार्थ, खाद्यतेल, मसाले आणि इतर खाद्यपदार्थांची विक्री होते. या पार्श्वभूमीवर अन्नपदार्थांची गुणवत्ता, स्वच्छता आणि सुरक्षितता यावर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे. भेसळ किंवा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांवर आवश्यकतेनुसार कठोर कारवाई केली जाणार आहे.
HFSS पदार्थांबाबतही नागरिकांना आवाहन
दरम्यान, FDAकडून नागरिकांनाही सणासुदीच्या काळात आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येणार आहे. HFSS म्हणजे जास्त चरबी, साखर आणि मीठ असलेल्या पदार्थांचे सेवन मर्यादित ठेवावे, असे आवाहन करण्यात आले आहे. सणांचा आनंद घेताना केवळ HFSS पदार्थांवर भर न देता पौष्टिक आणि आरोग्यदायी अन्नपदार्थांना प्राधान्य द्यावे, असा संदेश FDAकडून देण्यात येत आहे. आरोग्याचा आनंद घ्या, केवळ HFSS पदार्थांचा नाही, असा दृष्टिकोन प्रशासनाकडून मांडला जात आहे.
Leave a Reply