
शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार अरविंद सावंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटावर जोरदार टीका केली आहे. शिंदे गटाकडून वारंवार दिल्लीच्या फेऱ्या मारल्या जात असल्याबद्दल त्यांनी तीव्र आक्षेप घेतला. सावंत यांनी म्हटले की, “तुम्ही पाठीत सुरा खुपसला हे इतिहासात येणार आहे. ते दुर्दैव आहे महाराष्ट्राचे.”
यावेळी त्यांनी शिंदे गटाने भाजपशासित राज्यांमध्ये आसरा घेतल्याचा संदर्भ देत “आपला सैनिक मोगलांना जाऊन मिळतो तशी तुमची वृत्ती आहे,” अशा शब्दांत टीका केली. रेल्वेच्या सुविधांबाबतही सावंत यांनी प्रश्न उपस्थित केले. मुंबई सीएसएमटी ते सावंतवाडीपर्यंतच्या गाडीच्या शुल्कातील वाढ कमी करण्याची मागणी त्यांनी केली. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा मेघडंबरीतील पुतळा असावा या मागणीचाही त्यांनी पुनरुच्चार केला.
सावंत यांच्या मते, “महाराष्ट्राला कलंक लावण्याचे काम कोणी केले असेल तर ते या गद्दारांनी केले आहे. हा कलंक फक्त शिवसेनेला नाही, तर महाराष्ट्राला आहे.” न्यायव्यवस्थेकडून आता काय होते, याकडे लक्ष असल्याचेही त्यांनी नमूद केले.
Leave a Reply