• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

सद्गुरू यांच्या संकल्पनेतील सेव्ह सॉइल-कावेरी कॉलिंग या अभियानांतर्गत 13.4 कोटी झाडांची लागवड

May 30, 2026 by admin Leave a Comment


नवी दिल्ली, 29 मे 2026 : सेव्ह सॉइल – कावेरी कॉलिंग या अभियानांतर्गत आतापर्यंत 13.4 कोटी झाडांची लागवड करण्यात आली असून, 2.6 लाख शेतकऱ्यांनी वृक्षआधारित शेतीचा स्वीकार केला आहे. 2026-27 या वर्षात आणखी 1.2 कोटी रोपांची लागवड करण्याचे उद्दिष्ट या अभियानाने ठेवले आहे. पर्यावरण संवर्धन आणि शेतकऱ्यांच्या उपजीविकेला बळ देणाऱ्या या उपक्रमाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.

सद्गुरू यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या सेव्ह सॉइल-कावेरी कॉलिंग या शेतकरी-केंद्रित पर्यावरणीय चळवळीचा उद्देश कावेरी नदीचे पुनरुज्जीवन करणे आणि वृक्षआधारित शेतीद्वारे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे हा आहे. जंगलांवर अवलंबून असलेल्या कावेरी नदीच्या प्रवाहात गेल्या 70 वर्षांत 40 टक्क्यांहून अधिक घट झाली असून, तिचे मूळ वृक्षावरण 87 टक्क्यांनी कमी झाले आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी खासगी शेतजमिनीवर 242 कोटी झाडांची लागवड करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यासोबतच मातीची सुपीकता सुधारते, पाणी साठवण्याची क्षमता वाढते आणि 8.4 कोटी लोकांच्या जीवनाशी जोडलेल्या कावेरी नदीचा वर्षभर प्रवाह कायम राहण्यास मदत होते.

पत्रकार परिषदेत बोलताना सेव्ह सॉइल-कावेरी कॉलिंगचे प्रकल्प संचालक आनंद एथिराजालू म्हणाले, ’13 कोटी झाडे हा केवळ आकडा नाही. यामागे 2.6 लाख शेतकरी आहेत, ज्यांनी आपली शेती पद्धत कायमस्वरूपी बदलली आहे. एकपिकीय शेतीतून वृक्षआधारित शेतीकडे झालेला हा बदल पुढील दशकांत कावेरीचा प्रवाह कायम ठेवण्यास महत्त्वाचा ठरणार आहे. सरकार आणि शेतकरी एकत्र आले, तर भारत माती, पाणी आणि ग्रामीण अर्थव्यवस्था या तिन्ही क्षेत्रांमध्ये मोठे परिवर्तन घडवू शकतो.’

आनंद यांनी सांगितले की, ‘कावेरी कॉलिंग’ हा ‘सेव्ह सॉइल’ मोहिमेअंतर्गत राबवण्यात येणाऱ्या तीन प्रमुख उपक्रमांपैकी एक आहे. ‘सेव्ह सॉइल रिजनरेटिव्ह रिव्होल्यूशन’ (SS-RR) या उपक्रमाद्वारे वैज्ञानिक पुनरुत्पादक शेतीचे प्रशिक्षण दिले जाते, तर ‘सेव्ह सॉइल फार्मर्स मूव्हमेंट’ शेतकऱ्यांना फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन (FPO) च्या माध्यमातून बाजारपेठेशी जोडते.

तमिळनाडूमधील 58 वर्षीय आणि संयुक्त राष्ट्रांकडून गौरविण्यात आलेले शेतकरी वल्लुवन यांनीही पत्रकार परिषदेत अनुभव सांगितला. त्यांनी सांगितले की, ‘किमान नांगरणी, मल्चिंग आणि कव्हर क्रॉपिंगसारख्या पद्धतींचा अवलंब करून मी माझ्या जमिनीतील सेंद्रिय कार्बनचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढवले. नारळाच्या एकपिकीय शेतीचे रूपांतर मी विविध फळझाडे, लाकूडझाडे आणि मिरीच्या लागवडीसह बहुपदरी अन्नवनात केले. त्यामुळे खत आणि कीटकनाशकांवरील अवलंबित्व कमी झाले आणि दुष्काळ व पूर अशा परिस्थितींमध्ये शेती अधिक सक्षम बनली. यामुळे माझे उत्पन्न सहापट वाढले.’

मोठ्या प्रमाणावर दर्जेदार रोपांची उपलब्धता हा या अभियानाचा महत्त्वाचा भाग आहे. तमिळनाडूतील कडलूर येथे आशियातील सर्वात मोठी एकाच ठिकाणी असलेली रोपवाटिका उभारण्यात आली आहे. ही संपूर्ण रोपवाटिका महिलांकडून चालवली जाते आणि येथे 85 लाख रोपे तयार करण्याची क्षमता आहे. तिरुवण्णामलाई येथे आणखी 15 लाख रोपांची क्षमता असलेली दुसरी रोपवाटिका आहे.

या दोन्ही रोपवाटिकांमधून तमिळनाडूमधील 45 आणि कर्नाटकमधील 8 वितरण केंद्रांना रोपे पुरवली जातात. शेतकऱ्यांना साग, लाल चंदन, रोजवुड आणि महोगनीसारख्या 29 उच्च मूल्याच्या लाकूडझाडांसह एकूण 54 प्रकारची रोपे उपलब्ध करून दिली जातात. लाकूडझाडांची रोपे केवळ 5 रुपयांत, तर फळझाडे आणि फुलझाडांची रोपे 10 रुपयांत दिली जातात.

या अभियानांतर्गत 200 हून अधिक फील्ड अधिकाऱ्यांनी 2025 मध्येच 26,500 पेक्षा अधिक शेतजमिनींना भेटी देत मोफत मार्गदर्शन केले आहे. जमिनीचा प्रकार, खोली, पाण्याची उपलब्धता आणि हवामान यांचा अभ्यास करून योग्य वृक्षप्रजातींची शिफारस केली जाते. शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी 225 सक्रिय व्हॉट्सअॅप गटांद्वारे 60 हजारांहून अधिक शेतकऱ्यांशी सातत्याने संपर्क ठेवला जात आहे. सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत हेल्पलाइन सेवा उपलब्ध असून, शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे 24 ते 48 तासांत निराकरण केले जाते.

2025 मध्ये आयोजित तीन मोठ्या प्रशिक्षण शिबिरांमध्ये 14 हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. यात IISR, IIHR, KFRI, ICFRE, TNAU आणि सेंट्रल ग्राउंड वॉटर बोर्डसारख्या संस्थांतील तज्ज्ञांनी वृक्षआधारित शेतीबाबत मार्गदर्शन केले. ‘सेव्ह सॉइल रिजनरेटिव्ह रिव्होल्यूशन’ अंतर्गत 31 मार्च 2026 पर्यंत 532 प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात आले असून, 40,311 शेतकऱ्यांना पुनरुत्पादक शेतीसाठी प्रशिक्षित करण्यात आले आहे. तसेच 54,982 शेतकऱ्यांना व्हॉट्सअॅप गटांमध्ये जोडून सातत्याने मार्गदर्शन केले जात आहे.

गेल्या तीन वर्षांत 185 शेतकऱ्यांना तीन महिन्यांच्या इंटर्नशिप प्रशिक्षणाद्वारे प्रशिक्षित करण्यात आले आहे. तांत्रिक आणि डिजिटल माध्यमातूनही या मोहिमेचा मोठा विस्तार झाला असून, SS-RR अंतर्गत 1,260 तांत्रिक व्हिडिओ यूट्यूबवर अपलोड करण्यात आले आहेत. या व्हिडिओंना 29.6 कोटी व्ह्यूज मिळाले असून, 11.83 लाख सबस्क्रायबर्सचा मजबूत समुदाय तयार झाला आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Coastal Road Accident | कोस्टल रोडवर अपघात अन् मुंबई ठप्प! वरळी ते नरिमन पॉईंटपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा
  • रेवती सुळेच्या लग्नात क्रिकेटर रिंकू सिंहच्या होणाऱ्या पत्नीचा बोलबाला
  • कोण आहे ती पाकिस्तानी अभिनेत्री? जिचा लंडनमध्ये साराने साजरा केला वाढदिवस, Video व्हायरल
  • तुम्ही पाहिलंत का? भर मंचावर राहुल शेवाळेंनी सांगितलं तरी… पक्षप्रवेशावेळी ओमराजेंच्या बॉडी लँग्वेजचीच चर्चा!
  • Vidhansabha Rada | विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात मंत्र्यांची दांडी! विरोधक आक्रमक

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in