
मुंबईसह उपनगरांमध्ये मुसळधार पावसाचा जोर कायम असून, विरारमध्ये अनेक भाग जलमय झाले आहेत. सततच्या पावसामुळे शहरातील प्रमुख रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून, नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
विरारमधील बोळींज परिसर, विवा कॉलेज रोड आणि विरार बस डेपो परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचे चित्र समोर आले आहे. या भागांतील रस्ते पूर्णपणे जलमय झाल्याने वाहनचालकांना पाण्यातून मार्ग काढत प्रवास करावा लागत असून, वाहतुकीचा वेगही मोठ्या प्रमाणात मंदावला आहे.
मुंबई शहरासह उपनगरांमध्येही पावसाने जोरदार हजेरी लावली असून, हवामान विभागाने संपूर्ण मुंबई महानगर क्षेत्रासाठी रेड अलर्ट जारी केला आहे. मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आल्याने प्रशासन सतर्क झाले आहे.
दरम्यान, सोशल मीडियावर समोर आलेल्या दृश्यांमधून विरारमधील परिस्थितीची तीव्रता स्पष्टपणे दिसून येत आहे. रस्त्यांवर साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांना पायी चालतानाही मोठी कसरत करावी लागत असून, वाहनधारकांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
प्रशासनाने नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, तसेच पाणी साचलेल्या रस्त्यांवरून प्रवास करताना विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन केले आहे. हवामान विभागाने पुढील काही तासांतही मुसळधार पावसाचा इशारा कायम ठेवला असल्याने परिस्थितीवर प्रशासनाकडून सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे.
Leave a Reply