
नवी मुंबईतील घणसोली परिसरात एक आठवड्यापासून सुरू असलेल्या पाणीटंचाईविरोधात संतप्त नागरिकांनी, विशेषतः महिलांनी, आज हंडा मोर्चा काढत प्रशासनाचा निषेध केला. घणसोलीकरांना गेल्या सात दिवसांपासून पाणी कमी दाबाने किंवा पूर्णपणे मिळत नसल्याने प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत होता. आजच्या या तीव्र आंदोलनामुळे प्रशासनाला दखल घेणे भाग पडले. स्थानिक रहिवाशांनी आरोप केला आहे की, मुकांबिका मंदिराशेजारील पाईपलाईनमध्ये जाणूनबुजून छेडछाड करण्यात आली आहे. यात राजकीय द्वेष आणि सूडबुद्धीचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. ज्यांच्या विरोधात मतदान झाले, त्यांच्याच माध्यमातून हा त्रास दिला जात असल्याचा दावा नागरिकांनी केला आहे. प्रशासनाने आंदोलनाच्या दबावाखाली येऊन आज दुपारपासून पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले आहे. नागरिकांनी स्पष्ट केले आहे की, जर हे आश्वासन पाळले नाही, तर उद्या याहून मोठा मोर्चा काढण्यात येईल. एका जागतिक दर्जाच्या शहरात मूलभूत पाण्याची समस्या उद्भवणे ही मोठी शोकांतिका असल्याचे नागरिकांनी म्हटले आहे.
Leave a Reply