• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते पाच राष्ट्रीय उपक्रमांचा शुभारंभ; ‘द आर्ट ऑफ लिव्हिंग’च्या 45 वर्षांनिमित्त स्मारक टपाल तिकिटाचे अनावरण

May 29, 2026 by admin Leave a Comment


बेंगळुरू, 29 मे 2026 : भारताचे माननीय उपराष्ट्रपती श्री सी.पी. राधाकृष्णन यांनी आज ‘द आर्ट ऑफ लिव्हिंग’ इंटरनॅशनल सेंटरमध्ये युवा विकास, उद्योजकता, शाश्वत विकास, चेतना अध्ययन आणि शिक्षणाशी संबंधित पाच महत्त्वपूर्ण राष्ट्रीय उपक्रमांचे शुभारंभ केले. संस्थेच्या मानवीय सेवेला 45 वर्षे पूर्ण होत असताना आणि गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्या 70 व्या वाढदिवसानिमित्त आयोजित या विशेष कार्यक्रमात त्यांच्या शांतता, मानवकल्याण आणि मानवी मूल्यांप्रती असलेल्या योगदानाचा गौरव करण्यात आला.

या कार्यक्रमादरम्यान माननीय उपराष्ट्रपतींनी इतर मान्यवरांसह ‘द आर्ट ऑफ लिव्हिंग’च्या 45 वर्षांच्या प्रवासावर आधारित स्मारक टपाल तिकिटाचेही अनावरण केले. हे तिकिट वैयक्तिक कल्याण, सामाजिक परिवर्तन आणि जागतिक शांततेसाठी संस्थेने केलेल्या कार्याचे प्रतीक मानले जात आहे. या वेळी सुरू करण्यात आलेल्या उपक्रमांमध्ये ‘यूथ करिअर एक्सलन्स प्रोग्राम’, ‘फॅकल्टी ऑफ ईस्टर्न नॉलेज सिस्टिम्स’, ‘आर्ट ऑफ लिव्हिंग इनोव्हेशन अँड एंटरप्रेन्योरशिप इन्क्युबेशन’, ‘सेंटर ऑफ एक्सलन्स ऑन कॉन्शियसनेस स्टडी अँड ह्युमन पोटेन्शियल’ आणि ‘इको शांती’ या उपक्रमांचा समावेश होता. शिक्षण, नवोन्मेष, पर्यावरणीय शाश्वतता आणि मानवी विकास या क्षेत्रांमध्ये संस्थेचा वाढता सहभाग या उपक्रमांतून अधोरेखित झाला.

‘द आर्ट ऑफ लिव्हिंग’ इंटरनॅशनल सेंटरमध्ये महिनाभर चाललेल्या उत्सवाचा हा समारोप सोहळा होता. या सोहळ्यात भारतासह जगभरातील 678 मान्यवरांनी सहभाग घेतला. विविध राजकीय पक्षांचे नेते, उद्योगपती, खेळाडू, उद्योजक, शिक्षणतज्ज्ञ, आध्यात्मिक गुरु, कलाकार आणि सामाजिक क्षेत्रातील व्यक्ती उपस्थित होत्या.

या कार्यक्रमात बोलताना उपराष्ट्रपती श्री राधाकृष्णन यांनी गुरुदेव श्री श्री रविशंकर यांनी उभारलेल्या या जागतिक चळवळीच्या प्रभावाचा गौरव केला. ते म्हणाले, “आज आपण अशा दूरदृष्टीचा उत्सव साजरा करत आहोत ज्याने जगभरातील कोट्यवधी लोकांच्या जीवनाला स्पर्श केला आहे. ‘द आर्ट ऑफ लिव्हिंग’ 182 देशांमध्ये कार्यरत असल्याचे जाणून मला आश्चर्य वाटले. मानवजातीला एकत्र जोडण्याचे मोठे कार्य ही संस्था करत आहे.”

उपराष्ट्रपती पुढे म्हणाले की, ’45 वर्षांपूर्वी एका साध्या पण गहन विचारातून या चळवळीची सुरुवात झाली, अंतर्गत शांतताच बाह्य सौहार्दाचा पाया आहे. संघर्ष आणि अस्थिरतेने वेढलेल्या जगात गुरुदेव श्री श्री रविशंकर विवेक, जागरूकता, शांती आणि सद्भावनेचे मूल्य सातत्याने मानवतेपर्यंत पोहोचवत आहेत.’ गुरुदेवांच्या व्यक्तिमत्त्वाचे कौतुक करताना त्यांनी म्हटले, ‘त्यांचे स्मित, त्यांची नम्रता आणि त्यांचा स्नेह प्रत्येकाच्या मनाला स्पर्श करतो. त्यांच्या योगदानाला विशेष बनवते ती म्हणजे त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील मानवता आणि साधेपणा.’

उपराष्ट्रपतींचे स्वागत करताना गुरुदेव श्री श्री रविशंकर यांनी आधुनिक जगातील समस्यांवर अंतर्मनाच्या विकासातून उपाय शोधण्याची गरज अधोरेखित केली. ते म्हणाले, ‘आज जगाने मान्य केले आहे की ध्यान ही आता चैनीची गोष्ट राहिलेली नाही. 192 देशांनी ‘वर्ल्ड मेडिटेशन डे’ साजरा करण्याचा निर्णय घेतल्याने ध्यान हे निरोगी, आनंदी आणि तणावमुक्त जीवनासाठी आवश्यक असल्याचे स्पष्ट झाले आहे.’ ते पुढे म्हणाले, आयुष्यभर तीन गोष्टी आपल्या सोबत असायला हव्यात — ज्ञान, ध्यान आणि संगीत.

जागतिक शांततेचा संदेश देताना त्यांनी सांगितले, ‘भीती, तणाव आणि द्वेषमुक्त ‘वसुधैव कुटुंबकम्’चे स्वप्न आपण पाहिले पाहिजे. शांत आणि सौहार्दपूर्ण व्यक्तींमधूनच शांततामय जगाची निर्मिती होते. कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गहलोत यांनीही कार्यक्रमाला संबोधित केले. त्यांनी सांगितले की, ‘या जागतिक चळवळीची मुळे कर्नाटकाच्या पवित्र भूमीत रुजलेली आहेत, ही राज्यासाठी अभिमानाची बाब आहे.

गहलोत पुढे म्हणाले, ‘चार दशकांहून अधिक काळ ‘द आर्ट ऑफ लिव्हिंग’ने वैयक्तिक, सामाजिक आणि जागतिक स्तरावर शांतता आणि कल्याणाचा संदेश दिला आहे. गुरुदेवांनी मानवी मूल्यांच्या पुनरुज्जीवनाद्वारे हिंसामुक्त आणि तणावमुक्त समाज निर्माण करण्यासाठी केलेले कार्य संपूर्ण जगात गौरवले जात आहे.’

या कार्यक्रमात सुरू करण्यात आलेल्या पाच उपक्रमांद्वारे शिक्षण, नवोन्मेष, पर्यावरणीय शाश्वतता आणि मानवी विकासाच्या क्षेत्रातील आधुनिक आव्हानांना उत्तर देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

‘यूथ करिअर एक्सलन्स प्रोग्राम’ अंतर्गत तरुणांना नागरी सेवांसाठी प्रशिक्षण देण्यात येणार असून ग्रामीण आणि शहरी युवकांसाठी उद्योगाभिमुख हॉस्पिटॅलिटी प्रशिक्षणही दिले जाणार आहे.

‘फॅकल्टी ऑफ ईस्टर्न नॉलेज सिस्टिम्स’ हा बहुविषयक मंच म्हणून कार्य करेल, ज्यामध्ये पूर्वेकडील ज्ञानपरंपरा आधुनिक शिक्षण आणि संशोधनाशी जोडल्या जातील.

‘आर्ट ऑफ लिव्हिंग इनोव्हेशन अँड एंटरप्रेन्योरशिप इन्क्युबेशन’ उपक्रमाद्वारे नवोन्मेषावर आधारित स्टार्टअप्सना मार्गदर्शन, प्रोटोटाइप सुविधा आणि प्रारंभिक आर्थिक मदत दिली जाईल. या माध्यमातून 500 स्टार्टअप्सना सक्षम करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

‘सेंटर ऑफ एक्सलन्स ऑन कॉन्शियसनेस स्टडीज अँड ह्युमन पोटेन्शियल’ चेतना, मानसिक आरोग्य आणि मानवी क्षमतांवर संशोधन आणि नवकल्पनांसाठी कार्य करेल.

‘इको शांती’ या पर्यावरणपूरक उपक्रमाचा उद्देश एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकचा वापर कमी करणे असून 2030 पर्यंत दरवर्षी किमान 1 लाख टन प्लास्टिक वापरात घट घडवण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

आश्रम भेटीदरम्यान उपराष्ट्रपतींनी संस्थेच्या विविध उपक्रमांची पाहणी केली. त्यांनी श्री श्री गुरुकुलममधील विद्यार्थ्यांशी संवाद साधला, प्रताप गणपती मंदिरात दर्शन घेतले, श्री सोमनाथ ज्योतिर्लिंगाच्या पवित्र अवशेषांचे दर्शन घेतले तसेच सुमारे 1600 देशी गायींच्या निवासस्थान असलेल्या श्री श्री गोशाळेलाही भेट दिली. या भेटीतील विशेष आकर्षण म्हणजे ‘द आर्ट ऑफ लिव्हिंग’च्या इंट्यूशन प्रोग्राममध्ये सहभागी मुलांनी सादर केलेली सहज ज्ञान क्षमतेची प्रात्यक्षिके होती.

सेवा, संस्कृती आणि मानवी मूल्यांचा महिनाभर उत्सव

संपूर्ण महिनाभर ‘द आर्ट ऑफ लिव्हिंग’ इंटरनॅशनल सेंटरमध्ये देश-विदेशातील हजारो लोकांनी सहभाग घेतला. या उत्सवात ‘वसुधैव कुटुंबकम्’ची भावना स्पष्टपणे दिसून आली.

या उत्सवात पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी, श्री सर्बानंद सोनोवाल, मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस, श्री एन. चंद्राबाबू नायडू, श्री प्रमोद सावंत, राज्यपाल श्री अजय कुमार भल्ला, लेफ्टनंट जनरल गुरमीत सिंह, अभिनेते रजनीकांत, विक्रांत मेसी, उद्योगपती मुकेश अंबानी, अनंत अंबानी, निरंजन हिरानंदानी तसेच अनेक आध्यात्मिक गुरु, कलाकार आणि राजनयिक उपस्थित होते.

महिनाभर विविध ध्यान सत्रे, सांस्कृतिक कार्यक्रम, मानसिक आरोग्य आणि चेतना विषयावरील चर्चा तसेच गुरुदेवांच्या कार्यामुळे बदललेली जीवनगाथा सादर करण्यात आली. हा संपूर्ण उत्सव गुरुदेवांच्या तणावमुक्त, हिंसामुक्त आणि मानवी मूल्यांवर आधारित समाजाच्या दृष्टीकोनाचे प्रतिबिंब ठरला.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Rain Update : 24, 25, 26, 27, 28 जून रोजी तुफान पाऊस, थेट अतिवृष्टीने धरणं भरणार, पंजाबराव डख यांचा नवा हवामान अंदाज समोर!
  • चोरून आणलेलं मनी प्लांट लावताय? होईल पश्चात्ताप, कर्जात जाल बुडून, वाचा काय होणार?
  • 2004 कॉल्स… 238 तास गप्पा… चेतनच्या प्रेमात अखंड बुडाली होती सिया.. केतन अग्रवाल हत्याकांडात तो एक धाग ठरला महत्त्वाचा
  • अखेर इराण झुकला… अमेरिकेची ती अट मान्य, डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ
  • जवळ असतील हे गुण तर तिजोरी जाईल भरून, श्रीमंती घेईल पायाशी लोळण, चाणक्य नीती काय सांगते?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in