
नामिबिया, झिम्बाब्वे आणि दक्षिण अफ्रिका या तीन संघांमध्ये टी20 मालिका खेळली जात आहे. या त्रिकोणीय मालिकेतील तिसरा सामना 31 ऑगस्टला झिम्बाब्वे आणि नामिबिया यांच्यात खेळला गेला. या सामन्यात झिम्बाब्वेने नामिबियाला 5 धावा राखून पराभूत केलं. नामिबियाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली होती. झिम्बाब्वेने 20 षटकात 6 गडी गमवून 195 धावा केल्या आणि विजयासाठी 196 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान काही नामिबियाला गाठता आलं नाही. नामिबियाचा संघ 190 धावांवर सर्वबाद झाला. अवघ्या पाच धावांनी पराभवाचं तोंड पाहावं लागलं. पण या सामन्यात एका विक्रमाने क्रीडाप्रेमींना आश्चर्याचा धक्का दिला. 2021 मध्ये रचलेला विक्रम एकदा नाही तर दोनदा मोडला गेला. त्यामुळे या सामन्याची चर्चा क्रीडावर्तुळात रंगली आहे. आता हा विक्रम आहे तरी कोणता हा प्रश्न पडल्याशिवाय राहणार नाही. चला तर याबाबत जाणून घेऊयात..
आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सातव्या जोडीचा विक्रम
टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यातील हा विक्रम होता सातव्या विकेटसाठी… या विकेटसाठी दोन्ही संघाच्या फलंदाजांनी जबरदस्त भागीदारी केली. त्यामुळे या जोडीचं कौतुक होणं सहाजिकच आहे. पहिल्यांदा झिम्बाब्वेची फलंदाजी होती. झिम्बाव्बेच्या 101 धावांवर 6 विकेट पडल्या होत्या. पण सातव्या विकेटसाठी रयान बर्ल आणि ब्रॅड इवान्स यांनी जोरदार फलंदाजी केली. या जोडीने सातव्या विकेटसाठी 48 चेंडूत नाबाद 94 धावा केल्या. तसेच 2021 साली ऑस्ट्रेलियाच्या डॅनियल सॅम्स आणि मार्कस स्टोइनिस यांनी केलेला विक्रम मोडीत काढला. या जोडीने न्यूझीलंडविरुद्ध खेळताना 92 धावांची भागादारी केली होती.
झिम्बाब्वेच्या या जोडीचा विक्रम मोडल्याचा आनंद फार काळ टिकला नाही. कारण नामिबियाच्या सातव्या विकेटसाठी जोडीने 110 धावांची भागीदारी केली. नामिबियाच्या झेन ग्रीन आणि बुइसिंग व्होल्चेंक या जोडीने 110 धावा केल्या आणि रयान बर्ल आणि ब्रॅड इवान्स यांच्या नावावर असलेला विक्रम आपल्या नावावर केला. नामिबियाच्या 76 धावांवर 6 विकेट पडल्या असताना या जोडीने केलेली 110 धावांची भागीदारी झिम्बाब्वेसाठी डोकेदुखी ठरली होती. पण विजयासाठी अवघ्या 10 धावा असताना ही जोडी फुटली आणि पराभवाचं तोंड पाहावं लागलं.
Leave a Reply