
भारत विरुद्ध पाकिस्तान… सामना कोणताही असो, कीडा अन् थरार हा ठरलेलाच आहे. महिला आशिया कप २०२६ मधील भारत-पाक महामुकाबल्यातही मैदानावर असाच ड्रामा पाहायला मिळाला. भारतीय महिला ब्रिगेडने पाकचा अवघ्या ५५ धावांत सुपडा साफ करत ७ विकेट्सने धुव्वा उडवला खरा पण या विजयासोबतच मैदानावर घडलेल्या ५ भन्नाट प्रसंगांनी सोशल मीडियाचा पारा भलताच वाढवलाय.
टॉस झाला, पण ‘नो हँडशेक’
नाणेफेकीच्या वेळीच सामन्यातील तणावाची पहिली ठिणगी पडली. टॉस उडवल्यानंतर भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौर आणि पाकिस्तानची कर्णधार फातिमा सना समोरासमोर आल्या, मात्र दोघींनीही हस्तांदोलन करणे टाळले. गेल्या काही काळापासून दोन्ही देशांतील राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर हा ‘नो हँडशेक’ पॅटर्न पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला.
शेफालीचा इशारा अन् मुनीबा आऊट
पाकिस्तानच्या डावादरम्यान भारतीय स्टार शेफाली वर्माने मुनीबा अलीला तंबूत धाडलं. विकेट घेताच शेफालीचा आक्रमक अवतार पाहायला मिळाला. तिने थेट पाकच्या ड्रेसिंग रूमकडे हात दाखवत मुनीबाला बाहेरचा रस्ता दाखवला.
फातिमाचा बदला अन् एग्रेशन
भारताच्या फलंदाजीदरम्यान पाकची कर्णधार फातिमा सना या अपमानाचा बदला घ्यायला टपूनच बसली होती. तिने १२ धावांवर खेळणाऱ्या शेफाली वर्माची दांडी उडवली. विकेट मिळताच फातिमाने शेफालीच्या तोंडासमोर जाऊन ड्रेसिंग रूमकडे जाण्याचा जळजळीत इशारा केला. फातिमाच्या या अति-आक्रमक सेलिब्रेशनचा व्हिडिओ क्षणार्धात व्हायरलही झाला.
कमेंटेटरचा सणसणीत टोला
फातिमाच्या त्या ओव्हर-द-टॉप सेलिब्रेशनवर समालोचक विवेक राजदान यांनी लाईव्ह कमेंट्रीतच तिची हवा काढली. “अहो मॅडम, ५५ धावांवर ऑलआऊट झाला आहात, जरा स्कोअरबोर्डकडे पण बघा!” अशा आशयाचा सणसणीत टोला राजदान यांनी लगावला अन् नेटकऱ्यांनीही याला पाठिंबा दिला आहे.
इरफान पठाणचा पुन्हा तोच ‘संडे’ टोमणा
सामना संपताच भारताचा माजी ऑलराउंडर इरफान पठाणने एक्सवर (ट्विटर) जोरदार सिक्सर ठोकला. भारताच्या दणदणीत विजयानंतर इरफानने पोस्ट केली त्याने लिहिलं की, “आज संडे है क्या?” भारत-पाक सामने बहुतांश वेळा रविवारी होतात आणि भारताकडून पाकचा कचरा होतो, या जुन्या आठवणींना उजाळा देत इरफानने पाक चाहत्यांची उरली-सुरली खिल्ली उडवली आहे.
भारताचा धडाका सुरुच
मैदानावरील या घडामोडी आणि वाद रंगत असताना भारतीय महिला संघाने मात्र आपल्या खेळाने पाकिस्तानला साफ निष्प्रभ केले. भारतीय फिरकीपटूंच्या फिरकीच्या जाळ्यात पाकचा संपूर्ण संघ ५५ धावांवर गारद झाला. हे किरकोळ आव्हान भारताने अवघ्या ८.४ षटकांत ३ गडी गमावून सहज पार केले. या विजयासह टीम इंडियाने आधीच निश्चित केलेले सेमीफायनलमधील स्थान आणखी मजबूत केले आहे.
Leave a Reply