
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने 27 एप्रिलला धमाका केला. गतविजेता आरसीबीने आयपीएल 2026 स्पर्धेतील 39 व्या सामन्यात होम टीम दिल्ली कॅपिट्ल्सचा त्यांच्याच घरच्या मैदानात 9 विकेट्सने धुव्वा उडवला. आरसीबीने दिल्लीला 75 धावांवर गुंडाळलं. त्यामुळे आरसीबीला 76 धावांचं माफक आव्हान मिळालं. आरसीबीने 6.3 ओव्हरमध्ये 1 विकेट गमावून विजयी आव्हान पूर्ण केलं. आरसीबीचा हा या मोसमातील सहावा विजय ठरला. आरसीबीने या विजयासह प्लेऑफच्या दिशेने वाटचाल सुरु केली आहे. तसेच या सामन्यादरम्यान आरसीबीचा सर्वात अनुभवी फलंदाज विराट कोहली याने इतिहास घडवला.
आरसीबीने जेकब बेथल याच्या रुपात पहिली आणि एकमेव विकेट गमावली. जेकबने 20 धावा केल्या. त्यानंतर विराटने देवदत्त पडीक्कल याच्यासह दुसऱ्या विकेटसाठी 22 बॉलमध्ये 51 रन्सची नॉट आऊट पार्टनरशीप केली आणि आरसीबीला विजयी केलं. विराटने दिल्ली विरुद्ध 15 बॉलमध्ये 153.33 च्या स्ट्राईक रेटने नॉट आऊट 23 रन्स केल्या. विराटने या खेळीत 2 षटकार आणि 1 चौकार लगावला. विराटने या दरम्यान कोणत्याच फलंदाजाला न जमलेली कामगिरी करुन दाखवली. तसेच विराटही अशी कामगिरी करणारा पहिलाच फलंदाज ठरला.
9 हजारी विराट
विराटने आयपीएल कारकीर्दीत 9 हजार धावा पूर्ण केल्या. विराट एका टीमकडून तसेच कारकीर्दीत 9 हजार धावा करणारा एकमेवाद्वीतिय फलंदाज ठरला. विराटला या सामन्याआधी 11 धावांची गरज होती. विराटने सहाव्या ओव्हरमधील शेवटच्या बॉलवर 1 रन घेतली. विराटने यासह आयपीएलमध्ये 9 हजार धावा पूर्ण केल्या.
विराटने यासह आयपीएल स्पर्धेत वेगवान 1 हजारच्या टप्प्यात धावा करण्याची मालिका यशस्वीरित्या कायम ठेवली आहे. विराटने याआधीही आयपीएल स्पर्धेत वेगवान 4 हजार, 6 हजार, 7 हजार आणि 8 हजार वेगवान धावा करण्याचा कारनामा केला आहे.
विराटची 19 व्या मोसमातील कामगिरी
दरम्यान विराटने आतापर्यंत 19 व्या हंगामात आरसीबीकडून आठही सामने खेळला आहे. विराटने या दरम्यान 58.5 च्या सरासरीने 351 धावा केल्या आहेत. विराटने या दरम्यान 3 अर्धशतकं लगावली आहेत. तसेच विराट आरसीबीसाठी या 19 व्या मोसमात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे.
Leave a Reply