
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने तिच्या दीर्घ कारकिर्दीत मराठीसोबतच हिंदी आणि इतर भाषांमधील अनेक दर्जेदार चित्रपटांमध्ये काम केलं आहे. 2019 मध्ये प्रदर्शित झालेल्या अली अब्बास जफर दिग्दर्शित ‘भारत’ या चित्रपटात तिने सलमान खानच्या आईची भूमिका साकारली होती. विशेष म्हणजे, सोनाली सलमान खानपेक्षा तब्बल नऊ वर्षांनी लहान आहे. त्यामुळे त्यांची आईची भूमिका त्यावेळी चर्चेचा विषय ठरली होती.
आता सोनालीने या भूमिकेबाबत आणि ती स्वीकारण्यामागच्या कारणाबाबत खुलासा केला आहे. ‘स्क्रीन स्पॉटलाइट’ला दिलेल्या मुलाखतीत सोनालीने सांगितलं की, 'भारत'मध्ये सलमान खानच्या आईची भूमिका करण्यासाठी ती सुरुवातीला तयार नव्हती. कास्टिंगच्या वेळी तिने ही भूमिका आपण करू शकत नसल्याचं स्पष्टपणे सांगितलं होतं.
मात्र दिग्दर्शक अली अब्बास जफर आणि कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाबरा हे सोनालीलाच या भूमिकेसाठी घेण्याबाबत ठाम होते. चित्रपटाच्या कथानकात फ्लॅशबॅकचा महत्त्वाचा भाग असल्यामुळे ही भूमिका विशेष होती. ‘भारत’च्या वेगवेगळ्या वयोगटातील प्रवासासाठी फ्लॅशबॅक महत्त्वाचा असल्याचं सोनालीने सांगितलं. त्यामुळे तिने अखेर या भूमिकेकडे एक आव्हान म्हणून पाहिलं.
सलमान खानच्या आईची भूमिका का स्वीकारली, यामागे आणखी एक व्यावहारिक कारण होतं. सोनालीने स्पष्टपणे सांगितलं की, तिला या चित्रपटासाठी खूप चांगली फी मिळाली होती. त्यामुळे भूमिकेच्या वेगळेपणासोबतच तिला या प्रोजेक्टमध्ये काम करण्याचा आर्थिकदृष्ट्याही फायदा झाला.
विशेष म्हणजे, सोनालीचे चित्रपटातील बहुतांश सीन युवा ‘भारत’ची भूमिका साकारणाऱ्या बालकलाकारासोबत होते. मोठ्या वयातील सलमान खानसोबत तिचे फार कमी सीन होते. त्यामुळे वयातील अंतर असूनही भूमिका साकारताना फारशी अडचण आली नसल्याचं तिने स्पष्ट केलं. सेटवरील अनुभवाबद्दल बोलताना तिने सलमानच्या स्वभावाचं कौतुक केलं. लोकांशी चांगल्या पद्धतीने कसं वागावं, हे सलमानकडून शिकता येतं, असं तिने म्हटलं.





Leave a Reply