
वुमन्स टीम इंडिया हरमनप्रीत कौर हीच्या नेतृत्वात दक्षिण आफ्रिका दौऱ्याची सुरुवात विजयाने करण्यात अपयशी ठरली. यजमान दक्षिण आफ्रिका विरुद्ध टीम इंडिया यांच्यात 5 सामन्यांची टी 20I मालिका खेळवण्यात येत आहे. या मालिकेतील सलामीच्या सामन्यात शनिवारी 17 एप्रिलला दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियावर 6 विकेट्सने विजय मिळवला. दक्षिण आफ्रिकेने 158 धावांचं आव्हान हे 5 बॉलआधी 4 विकेट्स गमावून पूर्ण केलं. त्यामुळे आता टीम इंडियाच्या महिला ब्रिगेडसमोर दक्षिण आफ्रिकेला सलग दुसरा सामना जिंकण्यापासून रोखण्याचं आव्हान असणार आहे.
उभयसंघातील दुसरा सामनाही किंग्समीडमधील डरबनमध्ये खेळवण्यात येत आहे. सामन्याला 19 एप्रिलला संध्याकाळी साडे 5 वाजता सुरुवात होणार आहे. त्याआधी 5 वाजता टॉस झाला. दक्षिण आफ्रिकेच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. कॅप्टन लॉरा वॉल्वार्ड हीने बॉलिंगचा निर्णय घेत भारताला बॅटिंगसाठी बोलावलंय. त्यामुळे भारताची सलामी जोडी महिला ब्रिगेडसाठी कशी सुरुवात करते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
टीम इंडियातून दोघींचा पत्ता कट
पहिल्या पराभवानंतर टीम इंडियाने प्लेइंग ईलेव्हनमध्ये 2 बदल केले आहेत. अनुष्का शर्मा हीचं टी 20I क्रिकेटमध्ये पदार्पण झालं आहे. तर क्रांती गौड हीला संधी देण्यात आली आहे. त्यामुळे या 2 बदलांमुळे टीम इंडिया विजयाचं खातं उघडणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तर दुसऱ्या बाजूला दक्षिण आफ्रिकेने पहिल्याच सामन्यातील प्लेइंग ईलेव्हनसह खेळण्याचा निर्णय घेतला आहे.
वुमन्स टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन: शफाली वर्मा, स्मृती मानधना, जेमिमाह रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कॅप्टन), ऋचा घोष (विकेटकीपर), अरुंधती रेड्डी, अनुष्का शर्मा, श्रेयंका पाटील, दीप्ती शर्मा, श्री चरणी आणि क्रांती गौड.
दक्षिण आफ्रिका वुमन्स प्लेइंग ईलेव्हन : लॉरा वॉल्वार्ड (कर्णधार), सुने लुस, तझमिन ब्रिट्स, ॲनेरी डेर्कसेन, ॲनेके बॉश, क्लो ट्रायॉन, नादिन डी क्लर्क, सिनालो जाफ्ता (विकेटकीपर), अयाबोंगा खाका, तुमी सेखुखुने आणि नॉनकुलुलेको मलाबा.
Leave a Reply