
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वाखालील ओबीसी एल्गार मोर्चा पुणे जिल्ह्यातील पाटस टोलनाक्यावर पोहोचला आहे. मोठ्या संख्येने ओबीसी आंदोलक कार्यकर्ते या ठिकाणी जमले असून, त्यांनी पाटस टोलनाका अडवण्याचा प्रयत्न केला. मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करण्याची परवानगी मुंबई पोलिसांनी नाकारली असली तरी, लक्ष्मण हाके आणि ओबीसी आंदोलक मुंबईकडे जाण्याच्या आपल्या निर्णयावर ठाम आहेत.
या मोर्चाचा मुख्य उद्देश ओबीसी आरक्षण बचाव हा आहे. मनोज जरांगे-पाटील यांच्या आरक्षणाच्या मागणीला एक प्रकारे आव्हान देण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे. आंदोलकांकडे गोपीनाथ मुंडे, सावित्रीबाई फुले, आणि बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो असलेले बॅनर्स दिसत होते. पाटस टोलनाक्यावर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, पुणे पोलीस आंदोलकांना मुंबईकडे न जाण्याची विनंती करत आहेत. मात्र, आंदोलक ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याचे चित्र आहे. हा मोर्चा मुंबईच्या दिशेने पुढे सरकणार आहे.
Leave a Reply