
नेपाळमधील उत्तर भागाला महापूराचा तडाखा बसला. अचानक आलेल्या पाण्याच्या लोटाने अनेकांना पळण्याचीही संधी दिली नाही. तिबेटमधील एक बर्फाच्छादित धरण फुटल्याचा आणि त्याचवेळी भूकंप आल्याचाही दावा करण्यात येत आहे. एकाचवेळी नैसर्गिक संकटांचा येथील व्यवस्था सामना करू शकली नाही. या महापूरात किती भारतीय बेपत्ता झाले याची माहिती आता समोर आली आहे. त्यात राज्यातील काही जणांची आकडेवारी समोर आली आहे. नेपाळमध्ये अनेक जण पर्यटन आणि देवदर्शनासाठी गेले होते.
130 हून अधिक भारतीय बेपत्ता
नेपाळमध्ये मंगळवारी अचानक पाण्याचा महालोट आला. त्यात 130 हून अधिक भारतीय बेपत्ता झाल्याचे आतापर्यंतच्या आकडेवारीवरून समोर आले आहे. यामध्ये कैलाश मानससरोवर यात्रेसाठी गेलेल्या काही भाविकांचाही समावेश आहे. सध्याही नेपाळच्या अनेक भागात पर्यटक आडकल्याचे समोर येत आहे. पूर, रस्ते या पाण्याच्या तांडवात काडीकचऱ्यासारखे वाहून गेले. उत्तरी नेपाळच्या अनेक भागांचा जगाशी संपर्क तुटला आहे. काठमांडू येथील भारतीय दुतावासासह तामिळनाडू, पश्चिम बंगाल, केरळ, राजस्थान, उत्तर प्रदेशासह अनेक राज्यातील नागरिकांसाठी हेल्पलाईन जाहीर करण्यात आली आहे. आकडेवारीनुसार, जवळपास 59 भारतीय कैलास मानसरोवर यात्रेवर गेले होते. संपर्क व्यवस्था सुरळीत होईपर्यंत त्यांच्याविषयी कोणतीही माहिती समोर येणार नसल्याचा दावा करण्यात येत आहे.
महाराष्ट्रातील किती लोक अडकले?
प्राप्त माहितीनुसार, तामिळनाडूमधील 57 पैकी 37 पर्यटकांची कोणतीही माहिती समोर आलेली नाही. 20 लोकांशी संपर्क होऊ शकला आहे. हिमालयातील एका मंदिराकडे ही लोक जात होती. तर ईशा फाऊंडेशननुसार 77 सदस्य इमिग्रेशन सेंटरमध्ये होते. पण त्यांची कोणतीही माहिती हाती लागली नाही. तर 495 लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. पश्चिम बंगालची राजधानी कोलकत्ता येथील 32 लोकांचा एक गट अद्याप बेपत्ता आहे. हे लोक 21 ऑगस्ट रोजी नेपाळसाठी निघाले होते. बुधवारी तिबेटकडे जाण्यासाठी ते दुतावासात जमा झाले होते.
शेतकरी नेते राकेश टिकैत हे त्यांच्या साथीदारांसह नेपाळमधील पोखरा येथे अडकले होते. पण त्यांनी नंतर काठमांडू जवळ केले. वाहनं तिथेच सोडून ते दिल्लीकडे रवाना जाले. उत्तर प्रदेश सरकारने नागरिकांसाठी 1070 हा टोल फ्री क्रमांक जाहीर केला आहे.
महाराष्ट्रातील 7 पर्यटक नेपाळमध्ये अडकल्याची माहिती समोर आली आहे. यातील मुंबई आणि पुण्यातील चार लोकांशी संपर्क झाला आहे. इतर तिघांशी संपर्क सुरू आहे. राज्य सरकारने नातेवाईकांसाठी मंत्रालयात 24 तास कंट्रोल रूमची सोय केली आहे. केरलम राज्यातील 36 पर्यटकांचा एक गट सुरक्षित असल्याची माहिती समोर आली आहे. सिक्कीम, ओडिसा, उत्तराखंड आणि छत्तीसगड राज्यांनी सुद्धा हेल्पलाईन सुरू केली आहे.
Leave a Reply