
नाशिकमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला पूर आला असून, रामकुंड परिसरात मोठी बचावमोहीम राबवावी लागली. पाण्याची पातळी रात्रीतून अचानक वाढल्याने गांधी ज्योत परिसरात दोन नेपाळी पर्यटक अडकले होते. अग्निशमन दल आणि जीव रक्षक दलाच्या जवानांनी धाडसी रेस्क्यू ऑपरेशन राबवत दोघांची सुखरूप सुटका केली.
हवामान विभागाने नाशिक जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी केला असून, जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही जोरदार पाऊस झाल्याने गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. त्यामुळे गोदावरी नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली असून रामकुंड परिसरात पूरस्थिती निर्माण झाली आहे.
माहितीनुसार, संबंधित पर्यटक रात्री गांधी ज्योत परिसरात थांबले होते. मात्र, रात्री उशिरापासून नदीतील पाणी वेगाने वाढल्याने ते सकाळपर्यंत पुराच्या पाण्यात अडकले. परिस्थिती लक्षात आल्यानंतर त्यांनी मदतीसाठी हाक दिली.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि जीव रक्षक दल घटनास्थळी दाखल झाले. लाइफ जॅकेट, दोरखंड, टायर आणि अन्य बचाव साहित्याच्या साहाय्याने जवानांनी धोकादायक प्रवाहातून रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले. दोरखंडाच्या सहाय्याने प्रथम एका पर्यटकाला आणि त्यानंतर दुसऱ्या व्यक्तीला सुरक्षित बाहेर काढण्यात आले.
या थरारक बचाव मोहिमेला पाहण्यासाठी गोदावरी नदीकाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. वाढत्या पाण्याच्या प्रवाहामुळे पर्यटकांच्या चेहऱ्यावर भीती स्पष्टपणे दिसत होती. मात्र, बचाव पथकाच्या तत्परतेमुळे दोघांचीही सुखरूप सुटका करण्यात यश आले.
दरम्यान, सततच्या पावसामुळे गोदावरी नदीची पाणीपातळी आणखी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. प्रशासनाने नागरिक आणि पर्यटकांना नदीकाठापासून दूर राहण्याचे तसेच सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले आहे.
Leave a Reply