
संपूर्ण देशात आत रक्षाबंधनाचा सण साजरा करण्यात आला. कॉकरोच जनता पार्टी (CJP)चे संस्थापक अभिजीत दिपके यांनीही रक्षाबंधन साजरे केले आणि त्याचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले. दिपके यांनी शेअर केलेल्या राखीच्या फोटोमध्ये झुरळाच्या थीमची राखी दिसत आहे. यावर लिहिलेला मजकूर देखील चर्चेत आला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
अभिजीत दिपके यांच्या हातातील राखी चर्चेत
अभिजीत दिपके यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर हा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये झुरळासारखी दिसणारी राखी असून त्यावर ‘राखी आणि राजीनामा मुबारक’ असे लिहिलेले आहे. अभिजीत दिपके ही राखी आपल्या हातावर बांधताना दिसत आहेत. हा फोटो शेअर करताना दीपके यांनी केवळ स्मायली इमोजीचा वापर केला आहे.
अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वाखालील कॉकरोच जनता पार्टीने केंद्र सरकारसोबत चर्चेनंतर सुमारे महिनाभर आंदोलन स्थगित ठेवले होते. आता पक्षाने पुन्हा शांततापूर्ण आंदोलन सुरू करण्याची घोषणा केली आहे. 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाच्या दिवशी प्रस्तावित असलेल्या या मोर्चाचे नेतृत्व नीट परीक्षा रद्द करून नंतर पुन्हा परीक्षा घेण्यात आल्यानंतर कथितरित्या आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांचे कुटुंबीय करणार आहेत. तसेच जुलैमध्ये झालेल्या आंदोलनादरम्यान कथित पोलिसी कारवाईचा सामना करणाऱ्या विद्यार्थ्यांचे कुटुंबीयही या मोर्चात सहभागी होणार आहेत.
स्कूल ठीक करो आंदोलन
अभिजीत दिपके सध्या स्कूल ठीक करो आंदोलन चालवत आहेत. सरकारी शाळांची स्थिती हा आपल्या अभियानाचा प्रमुख मुद्दा बनवलेल्या कॉकरोच जनता पार्टीने सोमवारी सर्व राज्य सरकारांना पत्र लिहून गेल्या पाच वर्षांतील शाळांच्या मूलभूत सुविधांची स्थिती, शिक्षकांच्या रिक्त पदांची संख्या आणि शाळांना देण्यात आलेल्या निधीशी संबंधित माहिती मागितली आहे.
शिक्षणमंत्र्यांना पाठवलेल्या समान पत्रांमध्ये अभिजीत दिपके यांनी म्हटले आहे की, सोशल मीडियावर समोर येणाऱ्या सरकारी शाळांच्या छायाचित्रांवरून असे दिसून येते की, अनेक मुलांना अजूनही सुरक्षित पिण्याचे पाणी, वापरण्यायोग्य स्वच्छतागृहे, योग्य वर्गखोल्या आणि अगदी बसण्यासाठी बाकांसारख्या मूलभूत सुविधाही उपलब्ध नाहीत. दिपके यांनी पत्रात म्हटले आहे, भारताला स्वतंत्र होऊन 80 वर्षे झाली आहेत. या देशातील कोणत्याही मुलाला अशा परिस्थितीत शिक्षण घेण्यास भाग पाडले जाऊ नये. त्यांना प्राण्यांपेक्षाही वाईट वागणूक दिली जात आहे.’
Leave a Reply