
इराण आणि अमेरिकेमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा भारताच्या गॅस पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला होता. अमेरिकेसोबत सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर आधी इराणने स्ट्रेट ऑफ होर्मूज बंद केलं. त्यानंतर या ठिकाणी अमेरिकेनं देखील नाकेबंदी लावली. इंधन वाहतुकीसाठी स्ट्रेट ऑफ होर्मूज हा मार्ग अतिशय महत्त्वाचा आहे. कारण जगाला जेवढी इंधनाची गरज आहे, त्यातील सुमारे 25 टक्के वाहतूक याच मार्गाने होते. तर दुसरीकडे भारताला जेवढा इंधन पुरवठा होतो, त्यातील सुमारे चाळीस टक्के इंधन पुरवठा याच मार्गाने होते. त्यामुळे स्ट्रेट ऑफ होर्मूज बंद झाल्याने भारतात एलपीजी गॅसचा मोठा तुटवडा निर्माण झाला होता. व्यावसायिक गॅस मिळत नसल्याने काही काळ हॉटेल बंद ठेवण्याची वेळ आली होती. तसेच घरगुती गॅससाठी लोकांवर रांगा लावण्याची वेळ आली. आता हाच अनुभव लक्षात घेऊन भारत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. भारताने गॅस टंचाईवर मार्ग शोधून काढला आहे.
भारताने आता अमेरिकेकडून गॅस खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. सरकारी डेटामधील आकडेवारीनुसार चालू आर्थिक वर्ष 2026-27 मध्ये पहिल्या तीन महिन्यात भारताने अमेरिकेकडून पेट्रोलियम पदार्थांच्या केलेल्या खरेदीमध्ये वार्षिक आधारावर तब्बल 254 टक्के एवढी वाढ झाली आहे. ज्याची किंमत अंदाजे 2.60 अब्ज डॉलर एवढी प्रचंड आहे. यामध्ये प्रामुख्याने एलपीजी गॅसचा समावेश आहे. मात्र दुसरीकडे अमेरिकेतून भारत खरेदी करत असलेल्या कच्च्या तेलामध्ये मात्र वार्षिक आधारावर प्रचंड प्रमाणात घट झाली आहे. तब्बल 57.5 टक्क्यांनी घट झाली आहे.
समोर आलेल्या सरकारी आकडेवारीनुसार भारताने एप्रिल ते जून या महिन्यात अमेरिकेकडून मोठ्या प्रमाणात गॅस खरेदी केला. त्याला कारण देखील तसंच होतं. मध्य पूर्वेत अमेरिका आणि इराणमध्ये युद्ध सुरू होतं. त्यामुळे मध्य पूर्वेत मोठा संघर्ष निर्माण झाला होता. यामुळे इंधन पुरवठा मोठ्या प्रमाणात प्रभावीत झाला. इंधनाची आयात पूर्णपणे ठप्प होती. त्याला आता मार्ग म्हणजे भारताने अमेरिकेकडून गॅस खरेदीला सुरुवात केली आहे. दरम्यान मुबलक प्रमाणात गॅसचा पुरवठा झाल्यामुळे भविष्यात गॅसचे दर कमी होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे.
Leave a Reply