
राज्यासह विदर्भातील शतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. विदर्भावर पावसाच्या तुटीचे संकट अधिक गडद झाले असून, ऑगस्ट महिन्यात अपेक्षेच्या तुलनेत तब्बल 58 टक्के कमी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पावसाअभावी शेतीसह आगामी काळातील जलसाठ्यांवरही परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार, ऑगस्ट महिन्यात संपूर्ण विदर्भात सरासरी 297 मिलिमीटर पाऊस अपेक्षित होता. मात्र, प्रत्यक्षात केवळ 125 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्यामुळे ऑगस्ट महिन्यात विदर्भातील पावसाची तूट तब्बल 58 टक्क्यांवर पोहोचली आहे. यामुळे दुष्काळाचं महासंकट उभे राहण्याची शक्यता आहे.
अकोल्याला सर्वाधिक फटका
हवामान विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. प्रवीण कुमार यांच्या माहितीनुसार, पावसाच्या तुटीचा सर्वाधिक फटका अकोला जिल्ह्याला बसला आहे. अकोल्यात ऑगस्ट महिन्यात तब्बल 84 टक्के पावसाची तूट नोंदवण्यात आली. त्यापाठोपाठ अमरावतीमध्ये 82 टक्के, यवतमाळमध्ये 78 टक्के, वर्ध्यात 73 टक्के, तर नागपूर आणि वाशिममध्ये प्रत्येकी 71 टक्के पावसाची तूट राहिली आहे. ऑगस्ट महिन्यात अपेक्षित पावसाच्या तुलनेत निम्म्यापेक्षाही कमी पाऊस झाल्याने खरीप पिकांच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर पावसाची कमतरता कायम राहिल्यास भविष्यातील पिण्याच्या पाण्याचा तसेच सिंचनाच्या पाण्याचा प्रश्नही निर्माण होऊ शकतो.
2 ते 5 सप्टेंबरदरम्यान पावसाची शक्यता
दरम्यान, विदर्भासाठी काहीशी दिलासादायक बातमीही समोर आली आहे. 2 सप्टेंबर ते 5 सप्टेंबरदरम्यान विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मध्यम ते दमदार पाऊस पडण्याची शक्यता नागपूर हवामान विभागाने व्यक्त केली आहे. त्यामुळे सप्टेंबरच्या सुरुवातीला होणाऱ्या पावसामुळे ऑगस्ट महिन्यात निर्माण झालेली मोठी तूट काही प्रमाणात भरून निघते का, याकडे आता शेतकऱ्यांसह प्रशासनाचे लक्ष लागले आहे.
हवामान तज्ञ एस डी सानप यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात ऑगस्ट कोरडा गेला असतानाच, आता सप्टेंबरमध्येही सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. एलनिनो सक्रिय झाला असून इंडियन ओशन डायपोल तटस्थ आहे. या प्रभावामुळे मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांवर दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. त्यामुळे भविष्यात चिंता आणखी वाढण्याची शक्यता आहे.
Leave a Reply