
अभिनेत्री क्रिती सनॉनच्या रक्षाबंधनाच्या जाहिरातीवरून सुरू झालेला वाद आता आणखी रंगला आहे. या वादात अभिनेत्री आणि खासदार कंगना राणौत यांनी क्रितीच्या पोशाखावर आक्षेप घेतला होता. आता अभिनेत्री कुनिका सदानंदने कंगना यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे. कुनिकाने कंगनाचा काही वर्षांपूर्वीचा रक्षाबंधनाच्या निमित्ताने केलेला एक जाहिरातीचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत टोमणा मारला.
क्रिती सनॉनच्या GIVA ज्वेलरीच्या जाहिरातीतील कपड्यांवर कंगनाने टीका केली होती. क्रितीने रक्षाबंधनाच्या जाहिरातीत ब्रालेटसारखा ब्लाऊज, केप आणि ड्रेप्ड स्कर्ट परिधान केला होता. तिच्या या लूकवर सोशल मीडियावरूनही मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया उमटल्या.
कंगना यांनी या जाहिरातीवर टीका करत रक्षाबंधनासारख्या सणाच्या निमित्ताने अशा प्रकारचा पोशाख दाखवण्यावर प्रश्न उपस्थित केला होता. यानंतर सोशल मीडिया युजर्सनी कंगना यांच्या जुन्या रक्षाबंधनाच्या जाहिरातीतील लूक शोधून काढला.
त्या जाहिरातीत कंगना ऑफ-शोल्डर आणि डीप नेकलाइन असलेल्या आधुनिक पोशाखात दिसत होती. त्यामुळे नेटकऱ्यांनी कंगना यांच्या जुन्या जाहिरातीची तुलना तिच्या क्रितीवरील टीकेशी करण्यास सुरुवात केली. याच पार्श्वभूमीवर कुनिका सदानंदने कंगना यांच्या जुना जाहिरातीचा फोटो शेअर करत लिहिलं, ‘मेरा कुत्ता कुत्ता, तेरा कुत्ता टॉमी?’
कुनिकाचा हा टोमणा सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. कंगना यांच्या दुटप्पी भूमिकेवर कुनिकाने निशाणा साधला आहे. कुनिकाने केवळ कंगना यांच्यावर टोमणा मारला नाही, तर क्रितीला पाठिंबाही दिला. तिने क्रितीच्या भूमिकेला समर्थन देत वाद निर्माण झाल्यानंतर अभिनेत्रीला ट्रोलिंगचा सामना करण्यासाठी ब्रँडने एकटं सोडल्याबद्दल GIVA वरही टीका केली.
जाहिरातीतील कपडे आणि इतर तपशील कलाकार ठरवत नसतात, तर ब्रँड आणि त्याची टीम त्यांना मंजुरी देतात, असा मुद्दा त्यांनी मांडला. दरम्यान, क्रितीने स्वतः या वादावर प्रतिक्रिया देताना महिलांच्या कपड्यांवरून त्यांचं मूल्यांकन करण्याच्या मानसिकतेवर प्रश्न उपस्थित केला होता. सणाचं महत्त्व कपड्यांमध्ये नसून त्या सणामागच्या भावना आणि नात्यांमध्ये आहे, अशी भूमिका तिने मांडली.
या वादानंतर GIVA ने संबंधित जाहिरात मागे घेतली. ब्रँडने भारतीय संस्कृती, परंपरा आणि सणांबद्दल आदर असल्याचं सांगत, जाहिरातीमुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर तो आपला हेतू नसल्याचं स्पष्ट केलं.







Leave a Reply