
‘ठरलं तर मग’ मालिकेतील सायलीच्या भूमिकेमुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री जुई गडकरी हिने तिच्या आयुष्यातील एका अत्यंत कठीण प्रसंगाचा खुलासा केला आहे. काही वर्षांपूर्वी तिची प्रकृती अचानक बिघडली होती. या प्रसंगात ती तब्बल आठ ते दहा तास कोमा स्टेटमध्ये होती. जुईने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत या घटनेबद्दल सांगताना त्या काळातील आठवणींना उजाळा दिला. जुईने सांगितलं की, 20 फेब्रुवारी 2020 हा दिवस तिच्या आयुष्यातील महत्त्वाचा आणि तितकाच धक्कादायक दिवस होता. आदल्या रात्री नेहमीप्रमाणे झोपल्यानंतर सकाळी तिला जाग आलीच नाही. त्यानंतर जेव्हा शुद्ध आली, तेव्हा ती थेट रुग्णालयाच्या ICUमध्ये होती.
आयसीयूमध्ये जुईची आई तिच्या शेजारी बसलेली होती. या दरम्यान जवळपास आठ ते दहा तास ती कोमा स्टेटमध्ये असल्याचं तिला नंतर समजलं. या काळात नेमकं काय घडलं, याची तिला कोणतीही आठवण नाही. तिला रुग्णालयात नेण्यासाठी शेजारच्या काही लोकांनी मदत केली होती. तिची आई त्यावेळी घरी एकटी होती आणि अचानक घडलेल्या या प्रकारामुळे तीही गोंधळून गेली होती. शेजाऱ्यांनी जुईला खाली आणून रुग्णवाहिकेच्या मदतीने रुग्णालयात दाखल केलं.
View this post on Instagram
जुईने तिच्या आरोग्याबाबत बोलताना सांगितलं की, ती Rheumatoid Arthritis म्हणजेच RA Positive आहे. त्याच काळात तिच्या पिट्यूटरी ग्रंथीत प्रोलॅक्टिन ट्यूमर असल्याचंही समोर आलं होतं. याशिवाय तिला व्हर्टिगोचे अटॅकही येत होते. त्यामुळे तिच्या शरीरावर आणि मनावर एकाच वेळी अनेक गोष्टींचा परिणाम होत होता. मात्र, ती कोमा स्टेटमध्ये नेमकी कोणत्या कारणामुळे गेली, याचं निश्चित कारण आजही स्पष्ट झालेलं नाही, असं जुईने सांगितलं.
या कठीण अनुभवाकडे जुई आता वेगळ्या नजरेने पाहते. तिच्या मते, त्या घटनेनंतर आयुष्याकडे पाहण्याचा तिचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला. ती या काळानंतरच्या आयुष्याला आपली ‘सेकंड इनिंग’ मानते. पूर्वी घडलेल्या गोष्टींबद्दल सतत दुःख करण्याऐवजी आता प्रत्येक दिवस मनापासून जगण्यावर तिचा भर आहे. जुईच्या मते, या प्रसंगामुळे तिचा देवावरील विश्वास आणखी दृढ झाला. आता ती रोज देवासमोर उभी राहून काही मागण्याऐवजी केवळ आभार मानते. आयुष्यात मिळालेल्या प्रत्येक दिवसाबद्दल कृतज्ञ राहणं महत्त्वाचं असल्याचं ती सांगते.
Leave a Reply