
अभिनेता कमलेश सुतार यांनी ‘दृश्यम’ चित्रपटातील त्यांच्या भूमिकेच्या निवडीचा आणि शूटिंगदरम्यान आलेल्या अनुभवाचा एक किस्सा सांगितला आहे. एका पॉडकास्टमध्ये बोलताना त्यांनी चित्रपटाच्या सुरुवातीच्या काळातील आठवणी सांगितल्या. विशेष म्हणजे ज्या भूमिकेसाठी सुरुवातीला निर्मात्यांना कमलेश नको होते, त्याच भूमिकेसाठी नंतर त्यांना ‘परफेक्ट कास्टिंग’ म्हटलं गेलं. कमलेश सुतार यांच्या म्हणण्यानुसार, त्यांना एक फोन आला आणि समोरून विचारण्यात आलं, “क्या करे कमलेशजी? आप गायतोंडे के लिए सिलेक्ट हुए.” या वाक्यातूनच त्यांना परिस्थितीचा अंदाज आला. निर्मात्यांना गायतोंडेच्या भूमिकेसाठी आपण नको होतो, हे त्यांना जाणवत होतं. मात्र, त्यांनी त्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
सेटवर बसायला खुर्चीही दिली नाही
यानंतर मानधनही समोरच्यांनीच ठरवलं आणि कमलेश शूटिंगसाठी गोव्याला पोहोचले. मात्र, तिथे त्यांना सुरुवातीला फारसं महत्त्व मिळालं नाही. प्रोडक्शन टीममधील व्यक्ती त्यांना बसण्यासाठी खुर्चीदेखील देत नव्हती, असं त्यांनी सांगितलं. त्यावेळी कमलेश सिगारेट ओढत असत. सेटवरील काही लोकांच्या नजरेतून त्यांना एक प्रकारचा प्रश्न जाणवत होता—“अरे, हा कोण आहे? इतक्या मोठ्या रोलसाठी याला कसं कास्ट केलं?”
अजयसोबतचा सीन पाहिला अन्..
कमलेश यांनी यावेळी कलाकारांसाठी एक महत्त्वाची गोष्टही सांगितली. त्यांच्या गुरूंनी त्यांना चेहरा वाचायला शिका, असा सल्ला दिला होता. समोरच्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरून त्याच्या मनात काय सुरू आहे, हे ओळखता आलं पाहिजे, असं ते म्हणाले. मात्र, पुढे परिस्थिती पूर्णपणे बदलली. ‘दृश्यम’चं शूटिंग रामोजी फिल्म सिटीमध्ये सुरू असताना प्रोडक्शन टीमने अजय देवगण यांच्यासोबतचा कमलेश यांचा एक सीन पाहिला. तो सीन पाहिल्यानंतर टीमने कमलेश यांना बसवलं आणि त्यांच्यासमोर आपली चूक मान्य केली.
“सॉरी सर, आम्ही याआधी तुमचं काही काम पाहिलं नव्हतं,” असं प्रोडक्शन टीमने सांगितल्याचं कमलेश यांनी म्हटलं. त्यांनी ‘खाकी’मध्येही काम केल्याचा उल्लेख केला. दिग्दर्शक निशिकांत कामत हे मराठी असल्यामुळे एका मोठ्या भूमिकेसाठी मराठी कलाकाराची निवड करण्यात आली, असा त्यांचा समज असल्याचंही टीमने स्पष्ट केलं. अजय देवगण, रजत कपूर आणि तब्बू यांसारख्या कलाकारांसमोर हा अभिनेता कोण, असा प्रश्न सुरुवातीला त्यांना पडला होता. मात्र, कमलेश यांचा सीन पाहिल्यानंतर त्यांचा दृष्टिकोनच बदलला. “गायतोंडेसाठी तुम्ही परफेक्ट कास्टिंग आहात,” असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं.
Leave a Reply