
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आणि सूत्रसंचालक अर्चना पूरण सिंहने आपल्या अभिनय कारकिर्दीबाबत मोठा खुलासा केला आहे. अनेक हिट चित्रपट आणि 'द कपिल शर्मा शो'मधील लोकप्रिय उपस्थिती असूनही गेल्या अनेक वर्षांत दर्जेदार अभिनयाच्या भूमिका मिळाल्या नसल्याची खंत तिने व्यक्त केली आहे.
विशेष म्हणजे, 'बोल बच्चन' या सुपरहिट चित्रपटानंतर तब्बल दहा वर्षे तिला एकाही चित्रपटाची ऑफर मिळाली नसल्याचे तिने सांगितले. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अर्चना म्हणाली की, नुकताच प्रदर्शित झालेल्या 'टोस्टर' चित्रपटानंतर तरी नव्या भूमिका मिळतील अशी अपेक्षा होती.
मात्र, तसे झाले नाही. सध्या तिच्याकडे अभिनयापेक्षा ब्रँड एंडोर्समेंटचे प्रस्ताव अधिक येत असून, ती अजूनही चांगल्या आणि दमदार भूमिकांच्या प्रतीक्षेत आहे. अर्चना पूरण सिंह ही दीर्घकाळ 'द कपिल शर्मा शो'मध्ये परीक्षक म्हणून काम केले.
या कार्यक्रमामुळे तिला मोठी लोकप्रियता मिळाली असली तरी त्याच काळात चित्रपट आणि फिक्शन मालिकांमधील अनेक संधी गमवाव्या लागल्या. काही चित्रपटांमध्ये तिने काम केले, मात्र त्या भूमिका समाधानकारक किंवा प्रभावी नव्हत्या असे तिचे मत आहे.
दरम्यान, अर्चना पूरण सिंहला नुकतेच 'आदर्श बाल विद्यालय' या नव्या वेब सिरीजची ऑफर मिळाली असून, ओटीटीवरील फिक्शन विश्वात नव्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येण्याबाबत ती उत्सुक आहे.




Leave a Reply