
मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे. दरम्यान मराठा आरक्षण आणि जरांगे पाटील यांचं सुरू असलेल्या उपोषणावर मराठा आरक्षण अभ्यासक विनोद पाटील यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. यावेळी बोलताना त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या भाषेवरून नाराजी व्यक्त केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आमच्यावर आहे, त्यामुळे महिलांचा सन्मान झाला पाहिजे. कल्याणच्या सुभेदाराची सून परत करणारी अवलाद आमची आहे. भाषा चुकीची वापरली गेली असेल तर ती भाषा चुकीचीच आहे, असं यावेळी विनोद पाटील यांनी म्हटलं आहे.
ते पुढे बोलताना म्हणाले की, महिला दंडाधिकारी असो किंवा कोणीही महिला असो, चुकीचं वक्तव्य करणे योग्य नाही. परिस्थिती लक्षात घेतली पाहिजे, गेल्या चार दिवसांपासून मनोज जरांगे पाटील उपाशी आहेत, त्यामुळे थोडी चिडचिड साहजिक आहे. तरीही मी मनोज जरांगे यांना आवाहन करतो की आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोर उपोषण करत आहोत. त्यामुळे आपण जबाबदारीने भाष्य केलं पाहिजे. आता मराठा समाजाबद्दल इतर वावड्या उठवल्या जात आहेत, भाषेचा उल्लेख करून विषयांतर केलं जात आहे. त्यामुळे भाऊ म्हणून मित्र म्हणून मी भाषा चांगली वापरण्याची विनंती करतो, असं यावेळी विनोद पाटील यांनी म्हटलं आहे.
महिला जिल्हाधिकारी यांना मी सांगू इच्छितो की त्यांचा आमचा वाद नाही, मनापासून सांगतो. महिलांचा सन्मान आणि संरक्षण ही माझ्यासह सगळ्यांची जबाबदारी आहे. त्यामुळे गैरसमज करून घेऊ नये. कुठल्याच अधिकाऱ्यांच्या विरोधात मराठा समाज नाही. जिल्हाधिकारी महिला यांच्या विरोधात कुठलीही भाषा वापरली गेली नाही. मंचावर असताना काही शब्दांचा प्रयोग झाला मात्र तो त्यांच्यासाठी नव्हता. मनोज जरांगे यांना विनंती करतो की आपण चांगल्याच भाषेचा वापर करावा, असंही यावेळी विनोद पाटील यांनी म्हटलं आहे.
दरम्यान मनोज जरांगे पाटील हे एकनाथ शिंदे यांना सातत्याने टार्गेट करत आहेत, असं देखील बोललं जात आहे. यावर देखील विनोद पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांचा आम्ही सन्मान करतो. त्यांचं आणि मराठा समाजाचं अतूट नातं आहे. एकनाथ शिंदे यांना आम्ही कधीच टर्गेट करू शकणार नाहीत, असं त्यांनी यावेळी म्हलटं आहे.
Leave a Reply