
देशातील कोट्यवधी कार आणि बाईक मालकांना एक मोठा दिलासा मिळणार आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने वाहनांना प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्राविषयी (Pollution Under Control Certificate – PUCC) एक मोठा निर्णय घेतला आहे. 6 वर्षांपर्यंत जुन्या BS6 (BS-VI) खासगी वाहनांसाठी पीयूसी प्रमाणपाची वैधता आता एक वर्षांऐवजी 3 वर्षे करण्याचा प्रस्ताव आहे. हा नियम लागू झाल्यानंतर वाहनधारकांना दरवर्षी पीयूसी केंद्राची वारी करावी लागणार नाही. सरकारने याविषयीची एक अधिसूचना जाहीर केली आहे. त्यात नियमांमध्ये मोठ्या बदलावाचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.
काय आहे प्रस्ताव?
केंद्र सरकारने याविषयीच्या प्रस्तावाची अधिसूचना जाहीर केली आहे. त्यानुसार, 6 वर्षांपर्यंत जुनी BS-VI खासगी वाहनांसाठी PUC ची वैधता 1 वर्षांनी वाढवून 3 वर्षे करण्याचा प्रस्ताव आहे. तर 6 ते 10 वर्षे जुन्या BS-VI वाहनांना PUC प्रत्येक वर्षी तर 10 वर्षांपेक्षा अधिक जुन्या वाहनांना प्रत्येक 6 महिन्यांना PUC प्रमाणपत्र नुतनीकरण करावे लागेल. BS-IV वाहनांसाठी ही कालमर्यादा 6 महिने आणि BS-I, BS-II आणि BS-III वाहनांसाठी 3 महिन्यांच्या वैधतेचा प्रस्ताव समोर आहे.
मालवाहक वाहनांसाठी वेगळा नियम
या प्रस्तावात BS-VI कमर्शियल वाहनांसाठी वेगळी व्यवस्था प्रस्तावित आहे. 6 वर्षांपर्यंत जुन्या व्यावसायिक, मालवाहक BS-VI वाहनांसाठी PUC 2 वर्षांपर्यंत वैध असेल. 6 ते 10 वर्षे वाहनांसाठी प्रत्येक वर्षी PUC नुतनीकरण करावे लागेल. 10 वर्षांपेक्षा अधिक जुन्या वाहनांसाठी PUC दर 6 महिन्यात घ्यावी लागणार आहे.
नवीन नियम कधीपासून होणार लागू?
सरकारने आता याविषयीच्या प्रस्तावाची अधिसूचना काढली आहे. अजून अंतिम निर्णय जाहीर करण्यात आलेला नाही. यावर नागरिकांच्या हरकती आणि सूचना मागवण्यात येतील. त्यानंतर सरकार अंतिम अधिसूचना जाहीर करेल. सर्व सोपास्कार पूर्ण झाल्यानंतर सरकार नवीन नियम देशभर लागू करेल.
PUC नुतनीकरणाचा नवीन नियम काय?
या प्रस्तावानुसार, जर एखाद्या वाहनाचे PUC प्रमाणपत्र नवीन नियम लागू होण्याअगोदर तयार झाले असेल तर त्याची वैधता लागलीच बदलणार नाही. नवीन वैधता तेव्हा लागू होईल, जेव्हा नवीन नियमानुसार नुतनीकरण करण्यात येईल. जर वाहनधारक PUC ची मुदत संपण्याच्या 10 दिवसांपूर्वी त्याचे नुतनीकरण करेल, तर नवीन प्रमाणपण हे दुसऱ्या प्रमाणपत्राच्या अखेरच्या दिवसापासूनच ग्राह्य धरण्यात येईल. पण PUC चा कालावधी समाप्त झाल्यानंतर ते नुतनीकरण करण्यात येते. त्या तारखेपासून हे प्रमाणपत्र ग्राह्य असेल. देशातील वाहनधारकांसाठी हा मोठा दिलासा ठरणार आहे.
Leave a Reply