
अभिनेत्री हिमांशी खुराना आणि असिम रियाज यांच्या नात्यातील जुना वाद पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. दोघांनी सोशल मीडियावरून एकमेकांना अप्रत्यक्षपणे निशाणा साधल्यानंतर आता हिमांशीने थेट सीसीटीव्ही फुटेज आणि रेकॉर्डिंगचा उल्लेख करत मोठा इशारा दिला आहे. विशेष म्हणजे तिने 27 नोव्हेंबर 2023 च्या सकाळी घडलेल्या घटनेचा उल्लेख केला आहे. हिमांशीने नुकतंच पारस छाबराच्या पॉडकास्टमध्ये तिच्या आणि असिमच्या रिलेशनशिपबद्दल भाष्य केलं होतं. त्यांच्या नात्यात धार्मिक मतभेद महत्त्वाचा मुद्दा ठरल्याचं तिने सांगितलं होतं. यानंतर असिमने सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत आपण कधीही कोणाला धर्म बदलण्यास सांगितलं नसल्याचं स्पष्ट केलं आणि धर्माचा वापर एखाद्याला बदनाम करण्यासाठी करू नये, असं म्हटलं. यानंतर आता हिमांशीने लांबलचक पोस्ट करत असिमला जोरदार प्रत्युत्तर दिलं.
हिमांशीने तिच्या पोस्टमध्ये लिहिलं, ‘माझा वैयक्तिक प्रवास सार्वजनिकपणे शेअर करताना मी नेहमीच आदर आणि संवेदनशीलता जपली आहे. मग तो माझा बिग बॉसचा अनुभव असो, माझा आध्यात्मिक प्रवास असो किंवा माझ्या आरोग्याशी संबंधित बाबी असोत. मी माझ्या आयुष्यातील हे पैलू प्रामाणिकपणे शेअर केले आणि त्यांचा वापर कधीही कोणाचा अपमान करण्यासाठी किंवा कोणाला लक्ष्य करण्यासाठी केला नाही. मी कधीही जबरदस्तीने धर्मांतर झाल्याचं म्हटलं नाही. हे कथानक लोकांनी आणि माध्यमांनी तयार रचलेलं आहे.’
‘पण जेव्हा माझ्या आरोग्याची खिल्ली उडवली जाते आणि माझ्या संघर्षांवरच प्रश्न उपस्थित केले जातात, तेव्हा मर्यादा आखण्याची वेळ आली आहे, असं मला वाटतं. जर आपण पुराव्यांबद्दल बोलणार असू तर मग सगळ्या गोष्टींबद्दल बोलुयात. मी धर्मांतराशी संबंधित प्रकरणाबाबतचं तथ्य आणि पुरावे, सीसीटीव्ही फुटेज, रेकॉर्डिंग्स.. सगळं समोर ठेवण्यासाठी तयार आहे. 27 नोव्हेंबर 2023 च्या पहाटे नेमकं काय घडलं हे तुला आठवत असेल अशी आशा आहे. तसंच मला सहन कराव्या लागलेल्या हिंसाचाराबाबतही बोलुयात. जर तुम्हाला माझी प्रतिमा मलिन करायची असेल तर आता मी गप्प बसणारी नाही. तुमची तथाकथित प्रतिमा वाचवण्यासाठी सतत गोष्टी लपवत राहणं किंवा माझा वारंवार अपमान आणि अनादर होत असतानाही शांत राहणं, हे आता माझ्याकडून होणार नाही’, असा इशाराच हिमांशीने दिला आहे.
हिमांशीची पोस्ट-
— Himanshi khurana (@realhimanshi) August 24, 2026
या पोस्टमध्ये तिने पुढे असंही म्हटलंय, ‘वेगवेगळ्या प्रॉडक्शन हाऊस आणि चॅनलमधल्या लोकांनी तुमच्या अनेक गोष्टी झाकून ठेवल्या, पण आता मी त्यांच्यासारखी राहणार नाही. मी माझा सन्मान कायम जपला आणि तुमचाही आदर केला. त्यामुळे मलादेखील तसाच आदर मिळेल अशी माझी अपेक्षा आहे. जर हा आदर परस्पर नसेल तर आता गप्प राहण्याचं माझ्याकडे कोणतंही कारण नाही. जर तुम्हाला पुराव्यांचा खेळ खेळायचा असेल तर तो प्रामाणिकपणे खेळुयात. तथ्यांसह, जबाबदारी स्वीकारून आणि संपूर्ण सत्यासह.’
या पोस्टच्या अखेरीस हिमांशीने एक टीपसुद्धा लिहिली आहे. ‘मी माझा स्वत:चा प्रवास, माझे अनुभव आणि त्यातून मिळालेले धडे शेअर केले की लोकांना त्यात एवढी अडचण का वाटते? इतर प्रत्येकजण आपापल्या अनुभवांबद्दल खुलेपणाने बोलतात. मग मी माझा अनुभव शेअर करण्याचा निर्णय घेतला, तर ते वेगळं का मानलं जातं’, असा सवाल तिने केला आहे.
हिमांशीच्या या पोस्टनंतर असिमसोबत तिचा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे. हिमांशी आणि असिमची ओळख बिग बॉसच्या तेराव्या सिझनमध्ये झाली होती. शोदरम्यान दोघांच्या नात्याची खूप चर्चा झाली होती. 2023 मध्ये दोघांचा ब्रेकअप झाला. आता धर्म आणि पुराव्यांच्या दाव्यांमुळे हा वाद पुन्हा चर्चेत आला आहे.
Leave a Reply