
राजकुमार संतोषी दिग्दर्शित ‘चायना गेट’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फार मोठा यशस्वी ठरला नसला, तरी या चित्रपटातील ‘जगीरा’ या खलनायकाच्या भूमिकेने प्रेक्षकांच्या मनावर कायमची छाप पाडली. अभिनेता मुकेश तिवारी यांनी साकारलेल्या या भूमिकेची आजही चर्चा होते. त्यांच्या दमदार अभिनयामुळे अनेकांना ‘शोले’मधील गब्बर सिंहची आठवण झाली.
चित्रपटाला प्रदर्शित होऊन जवळपास 28 वर्षे झाली असली, तरी जगीराचे संवाद आणि त्याचा रौद्र अंदाज आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. विशेष म्हणजे ‘चायना गेट’मध्ये ओम पुरी, नसीरुद्दीन शाह, अमरीश पुरी आणि कुलभूषण खरबंदा यांसारखे दिग्गज कलाकार होते. मात्र, मुकेश तिवारी यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर या सर्वांमध्येही स्वतंत्र ओळख निर्माण केली.
जगीरा साकारण्यासाठी घेतली मोठी मेहनत
‘जगीरा’ हे डोंगराळ भागात राहणाऱ्या क्रूर दरोडेखोराचे पात्र होते. हे पात्र पडद्यावर अधिक वास्तववादी दिसावे यासाठी मुकेश तिवारी यांनी आपल्या लूकवर विशेष मेहनत घेतली होती. या भूमिकेसाठी त्यांनी तब्बल 50 दिवस अंघोळ केली नसल्याचे सांगितले जाते. पात्र अधिक अस्वच्छ आणि राकट दिसावे, यासाठी त्यांनी दाढी केली नाही तसेच केसही कापले नाहीत.
दीर्घकाळ अंघोळ न केल्यामुळे शरीराला दुर्गंधी येऊ नये म्हणून ते परफ्यूमचा वापर करत असत. त्यांच्या या लूकमुळे ते प्रत्यक्षातही इतके भयानक दिसू लागले होते की, शूटिंगच्या ठिकाणी त्यांना पाहून अनेकजण घाबरत असल्याचे किस्से सांगितले जातात.
शूटिंगदरम्यान घोड्यावरून पडून झाले जखमी
‘चायना गेट’च्या शूटिंगदरम्यान मुकेश तिवारी यांना एका प्रसंगात घोडेस्वारी करायची होती. मात्र, घोडा अचानक बेकाबू झाल्याने ते खाली पडले आणि जखमी झाले. तरीही त्यांनी शूटिंग थांबवली नाही. या भूमिकेसाठी घेतलेली त्यांची मेहनत आणि समर्पण त्यांच्या अभिनयातून स्पष्टपणे जाणवत होती.
चित्रपटातील त्यांचा ‘मेरे मन को भाया, मैं कुत्ता काट के खाया’ हा संवाद त्यावेळी विशेष गाजला. जगीराच्या रौद्र आणि विक्षिप्त अंदाजामुळे मुकेश तिवारी रातोरात लोकप्रिय झाले.
‘वसूली भाई’नेही मिळवून दिली वेगळी ओळख
‘चायना गेट’नंतर मुकेश तिवारी यांनी अनेक चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारल्या. मात्र, रोहित शेट्टी यांच्या ‘गोलमाल’ मालिकेतील ‘वसूली भाई’ ही व्यक्तिरेखाही प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली. या भूमिकेमुळे त्यांना आजही अनेक चाहते प्रेमाने ‘वसूली भाई’ म्हणून ओळखतात.
Leave a Reply