
पूर्वी पक्षाचं काम करताना समोसा खाऊन झोपत होतो. कोरोनानंतर शिस्तबद्धता आलीय. आता दररोज योगा करतो, असं सांगतानाच मी आता जास्त काम करु शकत नाही, नवीन पिढीला संधी द्यायला पाहिजे, असं विधान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. नागपुरात काटोल येथील ‘एकलव्य एकल विद्यालय शिक्षक – पर्यवेक्षक प्रशिक्षण वर्गा’च्या कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरी यांनी हे मोठं विधान केलं आहे. गडकरी यांच्या या विधानाची आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
आदिवासी विद्यार्थ्यांना संबोधित करताना नितीन गडकरी यांनी त्यांना आत्मविकास करण्याचा मंत्र दिला. तसेच आरोग्याला जपण्याचाही सल्ला दिला. मिळालेलं आयुष्य उत्तम जगलं पाहिजे. स्वत: जगलं पाहिजे. इतरांचं आयुष्य चांगलं जगवण्यासाठी मदत केली पाहिजे. हेच काम म्हणजे सामाजिक दायित्व आहे. हेच काम म्हणजे राष्ट्रीय काम आहे. मी काही प्रेरणास्त्रोत नाहीये, असं सांगतानाच आजकाल मी काही जास्त काम करू शकत नाही. ज्या वेळी करू शकलो तेव्हा केलं. आता माझाही कामातील सहभाग कमी झाला आहे. मी सर्वांना सांगितलं, नव्या पिढीच्या हाती काम दिलं पाहिजे. नवीन लोक आले आहेत. जुने त्यांना मार्गदर्शन करत आहेत. हळूहळू पुन्हा काम वाढत आहे, असं नितीन गडकरी म्हणाले.
इथं बसला, हार्ट अटॅक आला तर…
तरुणपणात माझं बेशिस्त आयुष्य होतं. त्याकाळी समोसा खायचो आणि रात्री झोपून जायचो. पण मी कोविडपासून काळजी घेऊ लागलोय. रोज सकाळी उठल्यावर मी अडीच तास व्यायाम करतो. प्राणायाम करतो. माझा ट्रेनर आहे, तो माझ्याकडून व्यायाम करून घेतो. मी एक मंत्र सांगतो. रोज सकाळी उठून अर्धा तास व्यायाम, प्राणायाम करा. सर्वांनीच करा. तुमची तब्येत चांगली असेल तर उपयोग आहे. तब्येत बिघडली तर सत्ता, संपत्ती, सौंदर्य आणि ज्ञानाचा काय उपयोग आहे? इथं बसला अन् एका मिनिटात हार्ट अटॅक आला तर काय येणार सोबत? गाडी नाही येणार, घोडा नाही येणार, बंगला नाही येणार. बायको नाही येणार आणि मुलं नाही येणार. कोणीच येणार नाही. खाली हात आया है, खाली हात जाणार आहे, असं गडकरी यांनी सांगितलं.
म्हणून त्याला पक्षाचा अध्यक्ष केला
माझं उदाहरण सांगतो. माझं आयुष्य इरेग्युलर, बेशिस्त होतं. माझ्या इतकं कुणाचंच आयुष्य इतकं बेशिस्त नसेल. भावनेच्या ओघात स्कूटरवर सायकलवर जायचो. पक्षाचं काम करायचो. एकाकडे त्याकाळी अॅम्बेसिडर होती. त्यामुळे आम्ही त्याला पक्षाचं अध्यक्ष बनवलं होतं. कारण पक्षाचे नेते विमानतळावर आले तर त्यांना येण्याजाण्याची सोय होईल. आता काळ बदलला. माझ्याकडे लूना होती. ती कू कू करायची. डबल सीट जायचो. नंतर विजय स्कूटर आली. त्या स्कूटरवर आम्ही चौघे बसून जायचो. पोलिसांनी पकडू नये म्हणून नंबर प्लेटवर हात ठेवून जायचो, असा किस्साही त्यांनी सांगितला.
एकाही गावात अंधार राहणार नाही
यावेळी त्यांनी संस्थेच्या कामाचा गौरवही केला. एक दिवस हे काम एवढं वाढेल की राज्यातील एकाही आदिवासी गावात अंधार राहणार नाही. प्रत्येक गावात उजेड होईल. त्यासाठी आपल्याला सर्वांनी मिळून काम करायचं आहे. या कामात स्वत:च्या व्यक्तित्त्वाचा, कार्याचा विकास करा. मनातील गुणांची गुणवत्ता वाढवा. आपलं व्यक्तीमत्त्व गुणाच्या आधारे वजनदार बनवा. स्वत:चा विकास झाल्यावर गरीबांच्या विकासासाठी वेळ द्या. ज्यांच्या जीवनात अंधार आहे, त्यांच्या आयुष्यात उजेड आणण्याचं काम करा, असं आवाहन त्यांनी केलं.
Leave a Reply