
पुण्यातील गणेशोत्सवाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले असते. यंदाच्या गणेशोत्सवात डीजेवर बंदी घालण्याचे संकेत मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले आहेत. त्यांनी पुणेकरांना पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले आहे. पुणे पोलिसांनीही डीजेच्या आवाजावर मर्यादा निश्चित केल्या आहेत. निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त आवाज झाल्यास स्पीकर जप्त केले जातील, अशी भूमिका पोलिसांनी घेतली आहे. यावर महाराष्ट्राचे शशी थरुर म्हणून ओळखले जाणारे विद्यानंद बापट यांनी भाष्य केले आहे. बापट यांनी तुकाराम मुंढे यांच्या नावाचाही उल्लेख केला आहे. बापट यांनी नेमकं काय म्हटलं ते जाणून घेऊयात.
विद्यानंद बापट यांनी नेमकं काय म्हटलं?
विद्यानंद बापट यांनी म्हटले की, ‘कायदे बनवताना त्यात पळवाटा कमी ठेवणे किंवा अजिबातच न ठेवणे गरजेचे आहे. आपण म्हणतो की लीगल लँग्वेज ही अचूक असते कारण त्यात पळवाटा खूप कमी असतात. कारण पळवाटा राहिल्या तर त्याच्या अंमलबजावणीमध्ये अडथळा निर्माण होतो. पुण्यात डीजे बाबतच्या नियमात अनेक पळवाटा आहेत. यातील महत्त्वाची पळवाट अशी की, लाऊडस्पीकरच्या वापराला स्थानिक अधिकारी म्हणजे कलेक्टर किंवा पोलिस कमिशनर यांना अधिकार दिलेले आहेत. त्यांना स्थानिक परिस्थितीचा विचार करून निर्णय घेण्याचे अधिकार दिलेले आहेत.
अप्रत्यक्षरित्या तुकाराम मुंढे यांचे कौतुक
पुढे बोलताना बापट यांनी म्हटलं की, ‘आता हे करता येऊ शकते की त्यांनी परिणाम लक्षात घेऊन परवानगी द्यायची. ते Shall इश्यू परवानगी नसून May इश्यू परवानगी आहे. Shall इश्यू म्हणजे तुम्ही फक्त फॉर्म भरला की तुम्हाला परवानगी मिळू शकते. पण May इश्यूमध्ये अधिकाऱ्यांना परिस्थितीचा विचार करून निर्णय घ्यायचा आहे. मात्र तसं होताना दिसत नाहीये. तुकाराम मुंढेंसारखे अधिकारी विरळच असतात. ज्यांच्यात इच्छा शक्ती असते. जिथे इच्छा तिथे मार्ग. अशी इच्छाशक्ती असणारे अधिकारी कमी असतात ना. आम्हाला असं वाटतं की जी पळवाट दिलेली आहे ती बंद करावी. सार्वजनिक ठिकाणी अशी परवानगी दिली जाऊ नये. म्हणजे वादाचा प्रश्नच उद्भवणार नाही.’
Leave a Reply