
सध्या पुण्यातील डिजेचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. गणेशोत्सव काळात डीजे असावा की नाही यावरून दोन मतप्रवाह पडले आहेत. विद्यानंद बापट यांनी डिजेला विरोध करताना काही महत्त्वाचे मुद्दे माडंले तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकर यांनी मात्र डीजेचं समर्थन करताना काही प्रश्न उपस्थित केले आहेत. ते टीव्ही 9 मराठीशीवर बोलत होते. डीजे असावा की नाही? यावरून रवींद्र धंगेकर आणि विद्यानंद बापट यांच्यामध्ये चांगलाच वादविवाद झाल्याचं यावेळी पहायला मिळालं.
लोकभावनेतून निर्माण झालेल्या सणावर बंधन नको, उद्या बापट सर्व सणांवर बंदी आणण्याची मागणी करतील, कुंभमेळा, नवरात्र सणांवर देखील बंदी आणा अशी मागणी करतील. असं यावेळी रवींद्र धंगेकर यांनी म्हटलं तर दुसरीकडे रवींद्र धंगेकर यांच्या आरोपांना उत्तर देताना डीजे प्रमाणेच ढोल ताशांचाही तितकाच त्रास होतो. परंपरेच्या नावाखाली याचं देखील समर्थन होऊ शकत नाही, असं यावेळी बापट यांनी म्हटलं.
दरम्यान डिजे, लाऊड स्पीकर म्हणजे देशावर फार मोठं संकट नाही, तुम्ही समजून घ्या बापट हे अलंकारीक मराठी भाषा बोलतात, त्यातून ते कसे वेगळे आहेत, हे भासवण्याचा प्रयत्न करतात. पण त्याचा काही उपयोग नाहीये, बापट यांनी जास्त पेरू खाल्ले मी खाल्ले नाहीत, म्हणून मला अशी भाषा बोलता येत नाही, असंही यावेळी धंगेकर यांनी म्हटलं आहे.
दरम्यान डीजे डॉल्बी ही आपली पंरपरा नाही, सणावर बंदी घालण्याचा माझ्या मुद्दा कधीच नाहीये. असंही यावेळी बापट यांनी म्हटलं आहे. तर त्याला प्रत्युत्तर देताना बापटांना क्रांती घडवायची असेल तर त्यांनी न्यायालयात जावं, असं यावर उत्तर शिवसेना शिंदे गटाचे नेते धंगेकर यांनी दिलं आहे. दरम्यान प्रत्येक सण उत्सवाला लोकभावनेची किनार असते, मात्र त्यामुळे जर नागरिकांना त्रास होत असेल तर त्यांनी तो का सहन करावा? असा थेट सवालच यावेळी बापट यांनी उपस्थित केला आहे.
Leave a Reply