
21 मे 2026 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झालेला 'देऊळ बंद 2' हा चित्रपट महिना उलटला तरी अजूनही प्रेक्षकांना चित्रपटगृहांपर्यंत खेचून आणत आहे. आयपीएलचा फिनाले असो किंवा फूटबॉलची क्रेझ.. 'देऊळ बंद 2'चे शोज मात्र अजूनही हाऊसफुल्ल सुरू आहेत. हा चित्रपट आता मोठा विक्रम रचण्यापासून अवघे दोन पावलं दूर आहे.
'देऊळ बंद 2' या चित्रपटाने पाच आठवड्यात 90.50 कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर इतर देशांमधून 6.10 कोटी रुपये आणि तंबू शोमधून 2.10 कोटी रुपयांचा गल्ला जमवत एकूण कमाईचा आकडा 98.70 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. त्यामुळे 100 कोटी रुपयांपासून हा फक्त दोनच पावलं दूर असल्याचं प्रवीण तरडेंनी म्हटलंय.
पुढचे तीन दिवस जगभरातील मराठी प्रेक्षकांनी जोर लावा.. असं आवाहन प्रवीण तरडेंनी केलं आहे. तर 100 कोटी नक्की पार होणार, असा विश्वास नेटकऱ्यांनी व्यक्त केला आहे. या चित्रपटात स्नेहल तरडे, मोहन जोशी, प्रवीण तरडे यांच्या मुख्य भूमिका आहेत. मोहन जोशी पुन्हा एकदा स्वामी समर्थांच्या भूमिकेत परतले आहेत.
मागच्या महिनाभरात 16 देश मिळून 165 शोज झाल्याचीही माहिती प्रवीण तरडेंनी दिली आहे. तर डेन्मार्क देशात पहिल्यांदाच कुठलातरी मराठी सिनेमा प्रदर्शित झाला. त्यासाठी 150 पेक्षा जास्त मराठी बांधव एकत्र जमल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
'देऊळ बंद 2' हा चित्रपट एकीकडे महाराष्ट्रात हाऊसफुल्ल होतोच आहे, पण त्याचसोबत परदेशातही तो अटकेपार झेंडा रोवत आहे. युएसए, जपान, जर्मनी, दुबई, युएई, ऑस्ट्रेलिया, पोर्तुगाल, डेन्मार्क, कॅनडा, सिंगापूर, युरोप, आयर्लंड, नेदरलँडमध्ये 150 पेक्षा अधिक शोज हाऊसफुल झाले, अशी पोस्ट प्रवीण तरडेंनी लिहिली आहे.





Leave a Reply