
योगेश बोरसे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, पुणे : खाऊन पिऊन आंदोलन करा. गांधी तत्त्वाप्रमाणे आपण आंदोलन करत असतो. मी देखील चोरून खायचो आणि आंदोलन करायचो, असा अजब सल्ला राज्याचे मंत्री नरहरी झिरवळ यांनी दिला आहे. गेल्या 14 दिवसांपासून आदिवासी विद्यार्थी उपोषण करत आहेत. त्यावर भाष्य करताना झिरवळ यांनी हा अजब सल्ला दिल्याने सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केलं आहे. झिरवळ यांच्या या सल्ल्यानंतर पत्रकारांनी त्यांना घेरलं असता सॉरी म्हणून झिरवळ यांनी काढता पाय घेतला आहे. मात्र, झिरवळ यांच्या या अजब सल्ल्याची सध्या राज्यात जोरदार चर्चा सुरू आहे.
पुण्यातील मांजरी परिसरात विविध मागण्यांसाठी गेल्या 14 दिवसांपासून आदिवासी विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे. या आंदोलकांना भेट देण्यासाठी आदिवासी मंत्री अशोक उईके आणि नरहरी झिरवळ आले होते. यावेळी त्यांनी भाषण करताना विद्यार्थ्यांना अजबच सल्ला दिला. तुम्हाला आंदोलन करायचे असेल तर जेवण करून करा. खाऊन, पिऊन करा. मीही अनेक आंदोलनं केली. आंदोलन करताना मी चोरून लपून खायचो. तुम्ही खूपच कडक आंदोलन करत आहात. कृपया तसं आंदोलन करू नका. स्वत:च्या जीवाचे नाहक हाल करू नका, असा सल्ला नरहरी झिरवळ यांनी दिला. मंत्री महोदयाच्या या सल्ल्याने आंदोलक अवाकच झाले.
पत्रकारांनी घेरताच काढता पाय
दरम्यान, नरहरी झिरवळ यांच्या या सल्ल्यानंतर पत्रकारांनी त्यांना घेरलं. तुम्ही 14 दिवस कुठे होतात? जेवू आंदोलन करण्याचे तुम्ही समर्थन करतात का? असा प्रश्नांचा भडिमार पत्रकारांनी झिरवळ यांना केला. त्यावर झिरवळ यांनी सॉरी म्हणत काढता पाय घेतला.
खात्यात कधी कोण नंबर…
रात्री चर्चा करून काही निर्णयापर्यंत आम्ही पोहोचलो आहोत. मात्र आंदोलनस्थळी गेल्यावर आपल्याच विरोधात ‘मुर्दाबाद’च्या घोषणा दिल्या जातात, असा चिमटा झिरवळ यांनी काढला. तरीही हे आपलेच आहेत, हक्काने बोलतात. त्यामुळे त्यांची समजूत घालू आणि प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करू, अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली. आमचं खातं जर धरलं, तर आमच्या खात्यात आम्हालाच पेच पडलाय, कधी कोण नंबर लावून बसेल काही भरोसा नाही, असं म्हणत अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या जबाबदारीबाबतही त्यांनी खंत व्यक्त केली.
तो संदेश द्यायचा असेल
झिरवळ यांच्या विधानावर विरोधकांनी प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी तर, तुम्ही खाऊन, पिऊन आंदोलन करा, असा संदेशच झिरवळ यांना द्यायचा असेल. त्यामुळे ते तसे बोलले असावेत, असं म्हटले.
त्यांचं विधान स्वभावाप्रमाणे
ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. झिरवळांचं विधान त्यांच्या स्वभावाप्रमाणे आहे. चांगला मंत्री म्हणून त्यांचं योगदान मोठं आहे, असं विनायक राऊत म्हणाले.
अशा वाचाळवीर मंत्र्यांना…
ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनीही यावर भाष्य केलं आहे. झिरवळांविषयी काय बोलायचं? मागच्यावेळी काय-काय कृत्य समोर आली. राज्याच्या मंत्रिमंडळात अशीच व्यक्तिमत्त्वे आहेत. कोणी नाचणारे, कोणी गाणारे आहेत. झिरवळांचं वक्तव्य विद्यार्थ्यांचं अपमान करणार आहे. वेगळ्याच खात्याकडे झिरवळांचं लक्ष आहे. अशा वाचाळवीर मंत्र्यांना सुनेत्राताईंनी सांभाळावं, असं अंबादास दानवे म्हणाले.
Leave a Reply