
मुंबईतील गोरेगाव इथलया नेस्को ग्राऊंडवर झालेल्या म्युझिक कॉन्सर्टदरम्यान दोन तरुणांचा ड्रग्जच्या अतिसेवनामुळे मृत्यू झाला होता. याप्रकरणात आता बॉलिवूड कनेक्शन समोर येत आहे. नेस्को सेंटरमध्ये आयोजित पार्टीत बॉलिवूड कनेक्शन समोर आलं आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या पार्टीमध्ये बॉलिवूडमधील दोन जण उपस्थित होते, ज्याचा तपास आता पोलीस करत आहेत. पोलिसांनी सीसीटीव्हीमध्ये दोन जणांना पाहिलं आहे, परंतु या प्रकरणात त्यांचा काही सहभाग आहे की नाही हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. तपासादरम्यान या दोघांची भूमिका उघडकीस आल्यास पोलीस त्यांच्यावरही कारवाई करू शकतात. सध्या गोरेगाव ड्रग्ज कनेक्शन केवळ मुंबई, महाराष्ट्राशीच नव्हे तर मुंबईबाहेरील राज्यांशीही जोडलेलं असल्याचं दिसत असून पोलीस या दिशेनेही तपास करत आहेत.
फरार आरोपीला अटक
गोरेगाव इथल्या म्युझिक कॉन्सर्टच्या नावाखाली आयोजित कथित रेव्ह पार्टीमध्ये ड्रग्जचं अतिसेवन करणाऱ्या दोन तरुणांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी मुंबई शहरातील वनराई पोलीस ठाणे इथं भारतीय न्याय संहिता आणि अंमली पदार्था, मनोव्यापार नियंत्रण कायदा 1985 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटननंतर आरोपी आयुष विकी साहित्य फरार झाला होता. अखेर पोलादपूर इथं केलेल्या नाकाबंदीमध्ये आयुष्यवर झडप घालून त्याला पकडण्यात आलं.
एक्सटसी नावाच्या ड्रग्जचं सेवन
आरोपी आयुष याने एक्सटसी या नावाचा अंमली पदार्थ गोरेगावच्या म्युझिक कॉन्सर्टमध्ये वितरित केलं होतं. पोलीस तपासात तसंच शवविच्छेदन आणि फॉरेन्सिक अहवालात हे निष्पन्न झालं होतं. मृत तरुण-तरुणीसह त्यांचया मित्रांपैकी काही सदस्यांनी कार्यक्रमस्थळी प्रवेश करण्यापूर्वी एक्सटसीचं सेवन केलं होतं आणि नंतर कार्यक्रमादरम्यान त्यांनी मद्यपान केलं होतं. त्यानंतर काहींनी अस्वस्थ वाटत असल्याची तक्रार केली. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केलं असता रविवारी पहाटे तरुणाचा आणि त्यानंतर दुपारी तरुणीचा मृत्यू झाला. या दोन विद्यार्थ्यांच्या मृत्यूच्या घटनेनंतर प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांची सहा विशेष पथकं तयार करण्यात आली आहेत.
दरम्यान या घटनेमुळे राज्य शासन आणि पोलिसांवर टीकेची झोड उठवली आहे. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. नेस्को सेंटरमध्ये शनिवारी 11 एप्रिल रोजी डिजे कॉन्सर्ट आयोजित करण्यात आलं होतं. मोठ्या संख्येने तरुण-तरुणी या कॉन्सर्टमध्ये गेले होते.
Leave a Reply