
आगामी दुलीप ट्रॉफीसाठी भारताचा युवा खेळाडू वैभव सूर्यवंशीची पूर्व विभागीय संघाच्या उपकर्णधारपदी निवड झाली आहे. या निवडीमुळे अनेक वाद आता निर्माण झाले आहेत. संघात अनेक अनुभवी खेळाडू असूनही 15 वर्षीय वैभववर ही जबाबदारी सोपवल्याने आता सगळे नाराज झाल्याचे समजत आहे. कर्णधार इशान किशनचा उपकर्णधार म्हणून त्याची नियुक्ती करण्याच्या पूर्व विभागीय निवड समितीच्या निर्णयावर सोशल मीडियावर आणि क्रिकेट तज्ज्ञांमध्ये मतभेद आहेत. 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीला, झिम्बाब्वेविरुद्धच्या नुकत्याच झालेल्या टी-20 मालिकेत ‘मालिकावीर’ म्हणून गौरवण्यात आल्यानंतर लगेचच उपकर्णधारपद मिळाले आहे.
झिम्बाब्वे दौऱ्यादरम्यान, त्याने तीन सामन्यांमध्ये 151 धावा करत उत्कृष्ट कामगिरी केली, ज्यात मालिकेतील अंतिम सामन्यातील 81 धावांच्या स्फोटक खेळीचा समावेश होता. इंग्लंडच्या निराशाजनक दौऱ्यानंतर, त्याने हरारेमध्ये दोन अर्धशतके झळकावून आपला फॉर्म परत मिळवला. आता वैभवला उपकर्णधार करणं हा निर्णय ईस्ट झोनकडून करण्यात आला आहे. या निर्णयावर होणाऱ्या टीकेच्या पार्श्वभूमीवर, ईस्ट झोनचे निवड समिती सदस्य आणि ओडिशाचे माजी रणजी खेळाडू प्रबंजन मलिक वैभवच्या बचावासाठी पुढे आले आहेत. ते म्हणाले की, “वैभवची नियुक्ती उपकर्णधार म्हणून करण्यात आली आहे, कर्णधार म्हणून नाही. कर्णधार ईशान किशन आहे आणि तो यष्टीरक्षकही आहे, त्यामुळे तो सामन्यांदरम्यान मैदानावर पूर्णपणे सक्रिय असेल. याचा अर्थ असा नाही की वैभव दिवसभर कर्णधारपद भूषवेल. वैभव काळासोबत अधिक परिपक्व होत आहे. त्याला जबाबदारी दिल्याने त्याचा आत्मविश्वास आणखी वाढेल. ही दुलीप ट्रॉफी त्याच्यासाठी शिकण्याची एक उत्तम संधी आहे. कुणास ठाऊक, तो भविष्यात भारतीय संघाचा कर्णधारही होऊ शकेल; हेच डोळ्यासमोर ठेवून त्याला हे पद देण्यात आले आहे.”
टीकाकारांना उत्तर देताना मलिक म्हणाले की, पूर्व विभागीय निवड समितीने हा निर्णय एकमताने आणि पूर्ण जबाबदारीने घेतला आहे. टीकेवरील आपली भूमिका स्पष्ट करताना ते पुढे म्हणाले, “प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे आणि आम्ही प्रत्येकाच्या मतांचा आदर करतो. व्यक्तींची मते वेगवेगळी असू शकतात आणि आम्ही ती बदलू शकत नाही. निवड समितीने संघाच्या भविष्यासाठी आणि सर्वोत्तम हितासाठी जे योग्य वाटले ते केले. हा आम्हा सर्वांचा सामूहिक निर्णय होता.”
Leave a Reply