
दिल्लीतील जंतरमंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान उपोषणकर्ते सोनम वांगचुक यांच्यावर सध्या दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. यासंदर्भात रुग्णालयाकडून अधिकृत मेडिकल बुलेटिनही जारी करण्यात आले आहे. सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीवर तज्ज्ञ डॉक्टरांचे विशेष पथक सातत्याने लक्ष ठेवून असून, आवश्यक ते वैद्यकीय उपचार सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीत सध्या स्थिरता असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, दुसरीकडे जंतरमंतर येथे आंदोलन सुरूच असून, कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके यांनी आमरण उपोषण सुरू ठेवले आहे. त्यांच्या उपोषणाचा आज दुसरा दिवस असून, आंदोलनकर्ते आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे दिसून येत आहे.
याच पार्श्वभूमीवर उद्यापासून संसदेचे अधिवेशन सुरू होत असून, आंदोलनकर्त्यांनी संसदेवर मोर्चा काढण्याचा निर्धार कायम ठेवला आहे. त्यामुळे दिल्लीतील आंदोलन आणि त्यासंदर्भातील पुढील घडामोडींवर देशभराचे लक्ष लागले असून, संसदीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी या आंदोलनाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Leave a Reply