
महिला आरक्षण विधेयक लोकसभेत नामंजूर झाल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन विरोधकांवर जोरदार टीका केली. “आरक्षणाच्या मुद्द्यावर कोणत्याही विरोधकाने माझ्यासोबत खुली चर्चा करावी, मी तयार आहे,” असं आव्हान त्यांनी दिलं.
या आव्हानाला प्रतिसाद देत खासदार सुप्रिया सुळे यांनीही डिबेटसाठी तयार असल्याचं सांगितलं. “वेळ आणि ठिकाण ठरवा, मी उपस्थित राहीन,” असं त्यांनी स्पष्ट केलं. विधेयक मांडलं जात असताना त्या दिल्लीत असल्याचं सांगत, त्या दिवशी नेमकं काय घडलं याची माहिती असल्याचाही दावा त्यांनी केला.
दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनीही फडणवीसांवर तीव्र टीका केली. “फडणवीस वकील आहेत, त्यांनी विधेयक नीट वाचावं,” असा टोला त्यांनी लगावला. तसेच, “संसदेत असलेल्या सदस्यांपेक्षा यांची अक्कल जास्त आहे का?” असा सवाल उपस्थित करत त्यांनी मुख्यमंत्री खोटं बोलत असल्याचा आरोप केला. राऊत यांनी पुढे दावा करत म्हटलं की, महिला आरक्षण विधेयक पाडण्यात आलेलं नाही. “भाजपमधील काही गटांमध्ये भविष्यातील सत्तेबाबतची राजकीय गणितं सुरू आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हटवण्याचे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे,” असंही त्यांनी नमूद केलं. तसेच, “मोदींनी इच्छाशक्ती दाखवली असती तर हे विधेयक मंजूर होऊ शकत होतं,” असं म्हणत राऊत या विधेयकामागे गृहमंत्री अमित शाह यांची भूमिका असल्याचाही दावा केला. या सगळ्या घडामोडींमुळे महिला आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा राजकीय वादाच्या केंद्रस्थानी आला असून, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचा सिलसिला सुरूच आहे.
Leave a Reply