
महिला आरक्षण विधेयकाच्या मुद्द्यावरून राज्यात राजकीय वाद अधिक तीव्र झाला असून, शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे. पत्रकार परिषदेत बोलताना अंधारे यांनी फडणवीसांवर “रेटून खोटं बोलत आहेत” असा आरोप केला. त्यांनी 2023 मधील भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या ट्विट्सचा दाखला देत सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेतील विसंगतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अंधारे म्हणाल्या की, 2023 मध्ये महिला आरक्षण विधेयक संसदेत मंजूर झाल्याचं स्वतः अमित शाह यांनी ट्विटद्वारे सांगितलं होतं. तसेच फडणवीसांनीही त्यावेळी ‘ऐतिहासिक क्षण’ असा उल्लेख केला होता. मग आता विरोधकांवर विधेयक पाडल्याचा आरोप का केला जातोय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. याशिवाय, अंधारे यांनी 1951 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महिला हक्कांसाठी दिलेल्या राजीनाम्याचा संदर्भ देत फडणवीसांना थेट आव्हान दिलं. “महिलांसाठी तुम्ही मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास तयार आहात का?” असा सवाल त्यांनी केला. या सर्व आरोप-प्रत्यारोपांमुळे महिला आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा राजकीय केंद्रस्थानी आला आहे.
Leave a Reply