
संजय दत्तला मराठी येत नाही वक्तव्यावर उपरती. ठाण्यातील दहीहंडी कार्यक्रमादरम्यान मराठी येत नसल्याचे वक्तव्य करत हिंदीत भाषण केल्याबद्दल अभिनेता संजय दत्तनं दिलगिरी व्यक्त केली आहे. “मला चांगली मराठी येते, कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर माफ करा,” असं त्यानं म्हटलंय. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत हा प्रकार घडला होता. सरनाईक रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी सक्तीची करण्याची भूमिका घेत असताना, त्यांच्यासमोरच दत्तनं “मी सहा वर्षे येरवडा जेलमध्ये राहूनही मराठी शिकलो नाही,” असं म्हटलं होतं. या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर दत्त आणि सरनाईक दोघांवरही टीका झाली होती.
आता संजय दत्तनं प्रताप सरनाईकांना फोन करून स्पष्टीकरण दिलं आहे. तो म्हणाला की, दहीहंडी कार्यक्रमातील माझे वक्तव्य केवळ एक मस्करी होती आणि हलक्या-फुलक्या विनोदाच्या ओघातून बोललो होतो. त्याने पुढे स्पष्ट केले की, माझे कुटुंबीय मुंबईकर आहेत. मी याच मातीत वाढलो असून महाराष्ट्राने मला भरभरून दिलं आहे. माझ्या बोलण्यानं काही चुकीचा संदेश गेला असेल किंवा कुणाच्याही स्वाभिमानाला धक्का पोहोचला असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो. या स्पष्टीकरणानंतर वाद निवळण्याची शक्यता आहे.
Leave a Reply