
NEET पेपर लीक प्रकरणात राजधानी दिल्लीत जंतर-मंतरवर सुरु झालेल्या आंदोलनाचा वणवा आता देशभरात पेटला आहे. समाजातील अनेक लोक यावर व्यक्त होत आहेत. खासकरुन चित्रपट सृष्टीतून सुद्धा प्रतिक्रिया उमटत आहेत. विद्यार्थ्यांना पोलिसांकडून झालेल्या मारहाणीचा निषेध सुरु आहे. आता बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान या मुद्यावर व्यक्त झाला आहे. सलमान खानची पोस्ट सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. मनोरंजन क्षेत्रातील अनेक जण व्यक्त होत असताना सलमान खान शांत कसा? असा प्रश्न अनेक जण विचारत होते. अखेर अभिनेता सलमान खानने मौन सोडलं आहे. त्याने सोशल मीडियावर एक मोठी पोस्ट केली.
“हे खूप शांततापूर्ण आंदोलन होतं. या आंदोलनाने हिंसक वळण घेतलं हे दु:खद आहे. जे विद्यार्थी आणि त्यांचे कुटुंबीय यामध्ये जखमी झालेत, त्यांच्याप्रती मला पूर्ण संवेदना आहे. पेपर लीक एक गंभीर मुद्दा आहे. आपल्या देशातले विद्यार्थी एका चांगल्या शिक्षण व्यवस्थेसाठी एकत्र येत आहेत, हे पाहून मला आनंद होतोय. मुलांच्या आई-वडिलांनी सुद्धा त्यांना साथ दिली आहे” असं सलमान खानने लिहिलय.
ते खूप साहसी आणि शूर
“विद्यार्थ्यांनी उचलेल्या या पावलाचं मी मनापासून कौतुक करतो. त्यांनी मेहनत, प्रामाणिकपणा आणि कठोर मेहनत करुन आपलं भविष्य बनवण्यासाठी एका चांगल्या, शिक्षित भारताच्या निर्माणाप्रती उत्साह दाखवला आहे. आंदोलन किंवा विरोध प्रदर्शन योग्य पद्धत आहे. विद्यार्थ्यांनी शांततापूर्ण आंदोलन केलय. ते खूप साहसी आणि शूर आहेत. शिक्षणाप्रती प्रेरित आणि उत्साहित असलेली ही पीढी भारताचं नाव उज्वल करेल” अशा शब्दात सलमान खानने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
याला राजकीय रंग देऊ नये
“हा विषय विद्यार्थी आणि शिक्षण व्यवस्थेमधला आहे. याला राजकीय रंग देऊ नये. याचं श्रेय केवळ आपल्या देशाच्या विद्यार्थ्यांना मिळालं पाहिजे. मला विश्वास आहे की, सरकारही पूर्ण समर्थन करेल. शिक्षण व्यवस्थेला अजून मजबूत बनवेल. सर्वांसाठी ही फायद्याची स्थिती आहे. एका सकारात्मक निर्णयाची अपेक्षा आणि प्रार्थना आहे. ज्या लोकांना शिक्षित व्हायचय, त्या सर्वांवर सदैव देवाची कृपा राहो” असं सलमान खानने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
Leave a Reply