
रायपूरमध्ये राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या एका अनोख्या फॅशन शोची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या फॅशन शोने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे. एकेकाळी छत्तीसगडच्या दंडकारण्यात, हातात बंदुका घेऊन हिंसाचार करणाऱ्या महिला नक्षलवाद्यांना आता आत्मसमर्पण केल्यानंतर नवी ओळख मिळाली आहे.
या आत्मसमर्पित महिला नक्षलवाद्यांनी रायपूरमधील या फॅशन शोमध्ये रॅम्प वॉक केला. या रॅम्प वॉकच्या माध्यमातून त्यांनी त्यांच्यामध्ये झालेल्या परिवर्तनाचे आदर्श उदाहरण भारतीयांसमोर ठेवले आहे. छत्तीसगडचा बस्तर जिल्हा एकेकाळी नक्षलवाद्यांचे दंडकारण्य म्हणून ओळखला जात असे, मात्र केंद्र सरकारच्या मोहिमांमुळे हा परिसर आता नक्षलमुक्त झाला आहे. सुरक्षा दलांच्या कठोर कारवाईनंतर अनेक नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पणाची भूमिका घेतली आहे.
छत्तीसगड सरकार आत्मसमर्पित महिला नक्षलवाद्यांसाठी कौशल्य विकास आणि पुनर्वसनाचे उपक्रम राबवते. त्यामुळे आता या महिला नक्षलवादी कॅफे चालवणे, शिवणकाम आणि हस्तकलेच्या माध्यमातून स्वतःची नवी ओळख निर्माण करत आहेत. त्यांना पुन्हा एकदा समाजापुढे आणण्यासाठी रायपूरमध्ये हा विशेष फॅशन शो आयोजित करण्यात आला होता. काही प्रोफेशनल मॉडेल्ससोबत या महिलांनीही रॅम्प वॉक केला आणि उपस्थितांची मने जिंकली. छत्तीसगडची पारंपरिक कोसा सिल्क आणि हातमागावर तयार झालेली वस्त्र परिधान करून या महिला रॅम्पवर आल्या होत्या. हा रॅम्प वॉक केवळ एक फॅशन शो नाही, तर नक्षलवादाकडून सन्मानजनक जीवनशैलीकडे झालेल्या मोठ्या परिवर्तनाचे प्रतीक ठरतो आहे.
Leave a Reply