
Rahul Roy: ‘आशिकी’ या चित्रपटातून रातोरात स्टार झालेला अभिनेता राहुल रॉय सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे पुन्हा चर्चेत आला आहे. आर्थिक अडचणी, आरोग्याच्या समस्या आणि कायदेशीर प्रकरणांबाबत राहुलने अलीकडेच भाष्य केलं. त्याचवेळी त्याची पूर्व पत्नी राजलक्ष्मी खानविलकरसोबतच्या नात्याची आणि घटस्फोटानंतर घेतलेल्या एका मोठ्या निर्णयाचीही चर्चा होत आहे. राहुल रॉय आणि राजलक्ष्मी खानविलकर यांची भेट 1998 मध्ये एका पार्टीदरम्यान झाली होती. राजलक्ष्मी त्या काळातील प्रसिद्ध मॉडेल होती. दोघांमध्ये मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि जवळपास दोन वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी 2000 मध्ये लग्न केलं.
लग्नानंतर काही काळ दोघांचं वैवाहिक आयुष्य सुखाचं होतं. मात्र, पुढे राजलक्ष्मीने तिच्या बिझनेससाठी ऑस्ट्रेलियात जाण्याचा निर्णय घेतला. राहुलही काही काळ तिच्यासोबत ऑस्ट्रेलियात राहिला. मात्र तिथे त्याला अपेक्षित व्यावसायिक संधी मिळू शकल्या नाहीत. त्यानंतर तो भारतात परतला आणि आपल्या करिअरवर लक्ष केंद्रित करू लागला. अखेरीस दोघांमध्ये अंतर वाढत गेलं. लाँग डिस्टन्स रिलेशनशिप टिकवणं कठीण झाल्याने त्यांनी परस्पर संमतीने वेगळं होण्याचा निर्णय घेतला. 2014 मध्ये त्यांच्या घटस्फोटाची प्रक्रिया पूर्ण झाली. दोघांना मुलं नसल्यामुळे विभक्त होण्याचा निर्णय तुलनेनं शांततेत घेता आल्याचं राहुलने सांगितलं आहे.
घटस्फोटानंतर पूर्व पत्नीच्या नावावर संपत्ती
राहुलने त्याच्या काही महत्त्वाच्या मालमत्ता स्वेच्छेने राजलक्ष्मीच्या नावावर केल्याचं समोर आलं आहे. या निर्णयाचा परिणाम त्याच्या आर्थिक परिस्थितीवरही झाला. मात्र, या सगळ्यानंतरही राजलक्ष्मीबद्दल आपल्या मनात कोणताही राग नसल्याचं राहुलने स्पष्ट केलं आहे. तिचं कुटुंब आजही आपल्यासाठी कुटुंबासारखंच असल्याचं त्याने म्हटलं आहे.
आरोग्याच्या समस्यांमुळे करिअरला मोठा ब्रेक
राहुलच्या आयुष्यातील आणखी एक मोठा टप्पा म्हणजे 2020 मध्ये आलेला ब्रेन स्ट्रोक. कारगिलमध्ये एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्याला स्ट्रोक आला होता. त्यानंतर त्याच्या चालण्यावर आणि बोलण्यावर परिणाम झाला आणि बराच काळ त्याला रिकव्हरीसाठी द्यावा लागला. आता 60 वर्षांच्या राहुलला पुन्हा आपल्या करिअरला सुरुवात करायची आहे. आर्थिक अडचणी असूनही तो काम मिळवून पुन्हा स्वतःचं आयुष्य उभं करण्याचा प्रयत्न करत आहे. कार्यक्रमांना उपस्थित राहून आणि मिळेल ते काम स्वीकारून तो कमाई करत असल्याचंही त्याने सांगितलं आहे.
Leave a Reply