
वातावरण बदलाचा फटका हिमालयाच्या कुशीतील नेपाळला बसला आहे. सतलुज नदीच्या खोऱ्यातील हिमाचल प्रदेश आणि तिबेटसह हिमालयीन क्षेत्रात हवामान बदलाचे दुष्परिणाम आता दिसत आहे. या भागात हजारो छोटे-मध्यम आणि मोठे तलाव आहेत. त्यांच्या संख्येत पूर्वीपेक्षा अधिक वाढ झाली आहे. 2023 मध्ये हिम तलावांची संख्या 1048 इतकी होती. 2019 मध्ये हा आकडा 560 इतकाच होता. सतलुज नदी खोऱ्यातील हिम तलाव हे जणू टाईम बॉम्ब ठरत आहेत. हे तलाव कधीही फुटू शकतात. नेपाळसह भारताच्या बिहार आणि इतर राज्यातील काही जिल्ह्यांना महापूराचा धोका निर्माण झाला आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि राष्ट्रीय हरित लवाद यांच्या ताज्या अहवालाने भारतासह नेपाळची चिंता वाढवली आहे.
काय आहे धोका?
या ताज्या अहवालानुसार, सतलूज नदीच्या खोऱ्यात हिम तलावांची संख्येत मोठी वाढ झाली आहे. हवामान बदलामुळे आणि पाण्याचा गतिरोधामुळे ते कधीही फुटू शकतात. परिणामी खालच्या भागात वेगाने पाण्याचा लोंढा येईल. त्यात दरड कोसळणे, मातीमुळे धोका अधिक वाढतो. नदीच्या काठच्या वसाहती, नागरी भागाला महापूराचा फटका बसू शकतो. जलविद्युत प्रकल्प, रस्ते, पूल आणि पर्यटनस्थळांना धोका निर्माण होऊ शकतो.
कायमस्वरुपी उपाय योजना हव्यात
या अहवालानुसार, राज्य सरकार आणि केंद्र सरकार मिळून भारतीय हिमालयीन क्षेत्रात कायमस्वरुपी उपाय योजनांवर भर द्यावा. या ठिकाणच्या हवामान बदलावर लक्ष ठेवण्यासाठी यंत्रणा उभारण्यात यावी. ड्रोन आणि सॅटेलाईटचा वापर करून संभावित धोके समोर आणावे. या धोक्यांच्या अभ्यासासाठी एक संस्था असावी. तज्ज्ञांचा चमू या भागात असावा. हवामान विभागासारखे त्यांचे दिवसातून अहवाल समोर यावेत. तर मोठ्या प्रमाणात पूराचे पाणी वाहून येताना त्यासंबंधीची उपाय योजना करावी. नदीकाठच्या वसाहतींचे स्थलांतर, नदी पात्राची खोली आणि पात्र विस्तार यावरही जोर देण्यात आलेला आहे.
पुन्हा मोठा धोका
नेपाळच्या राष्ट्रीय आपत्ती जोखीम निवारण आणि व्यवस्थापन प्राधिकरणाने भोटेकाशी आणि त्रिशुला नदीच्या काठ परिसरातील लोकांना पुन्हा धोक्याचा इशारा दिला आहे. या नद्यांमध्ये पाण्याचा वेगवान प्रवाह सुरू झाला आहे. वरील पट्ट्यात कुठेतरी हिम तलाव फुटल्याची शक्यता लक्षात घेत प्राधिकरणाने रसुवा, नुवाकोट आणि धादिंग जिल्ह्यांना पुन्हा हायअलर्ट दिला आहे. हाच पाण्याचा प्रवाह पुढे भारतात येत असल्याने बिहारमधील अनेक जिल्ह्यात अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Leave a Reply