
असं म्हटलं जातं की आयुष्यात कोणीच कायमचा मित्र नसतो, ना कायमचा शत्रू.. दोन दिवसांपूर्वी गळ्यात गळे घालून फिरणारे अचानक एकमेकांचं तोंडही बघायला तयार नसतात तर कधी वर्षोनुवर्षे शत्रुत्व असणारे अचानक गळाभेट घ्यायला तयार होतात. बॉलिवूडमध्येही असंच काहीसं चित्र दिसत असून अनेकांनी जुने मतभेद मिटवून एकमेकांसमोर मैत्रीचा हात पुढे केला. हे सगळं आत्ता सांगण्याचं कारण म्हणजे, प्रसिद्ध गायिका नेहा कक्करचा (Neha Kakkar) समोर आलेला एका फोटो. रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवर काही दिवस आधीच नेहा कक्करने तिची मोठी बहीण सोनू कक्करसोबतचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले. या फोटोंमध्ये नेहा आणि सोनूने अगदी सेम, मॅचिंग राख्या बांधलेल्या दिसत आहेत. विशेष म्हणजे, त्यांचा भाऊ आणि गायक टोनीही या खास क्षणी दोन्ही बहिणींसोबत दिसला.
गेल्याच वर्षी या भावडांमध्ये मतभेद असल्याच्या चर्चांना सोशल मीडियावर चांगलीच हवा मिळाली होती.गायिका सोनू कक्करने सोशल मीडियावर एक घोषणा करत सर्वांनाच मोठा धक्का दिला. बहीण नेहा आणि भाऊ टोनी कक्कर यांच्याशी सर्व संबंध तोडत असल्याचं तिने या पोस्टमधून म्हटलं होतं, नंतर तिने ही पोस्ट डिलीट केली तरी या भावंडांमध्ये काय बिनसलं याची चर्चा सुरू झाली होती. आणि आता बऱ्याच काळाने नेहाने सोनू आणि टोनी यांच्यासोबतचे फोटो शेअर केल्याने नेटकरी हैराण झालेत. बऱ्याच काळानंतर तिन्ही भावंडे एकत्र, आनंदी आणि मोकळेपणाने हसताना दिसल्यानं चाहत्यांचं लक्ष या पोस्टकडे वेधलं गेलंय.
View this post on Instagram
सोनू कक्करसाठी लिहीली इमोशनल पोस्ट
या पोस्टमध्ये नेहाने फोटो शेअर करताना सोनूसाठी खास प्रेमळ मेसेज लिहिला. ‘रक्षाबंधन अजून यायचं आहे, हे मला माहीत आहे. पण ही पोस्ट खास माझी बहीण सोनूसाठी आहे… लव्ह यू दीदी.’ असं तिने त्यात म्हटलं. विशेष म्हणजे नेहाच्या या पोस्टवरील सोनू कक्कर हिनेही लगेच रिप्लाय दिला आणि प्रेम व्यक्त केलं. ‘Awwww.. Love you my baby.” अशी कमेंट तिने केली. दोन्ही बहिणींमधील हा प्रेमळ बॉन्ड चाहत्यांना चांगलाच भावला आहे.

जुन्या मतभेदांनंतर पुन्हा एकत्र
कक्कर भावंडांमध्ये झालेल्या कथित मतभेदांबाबत गेल्या वर्षी अनेक चर्चा रंगल्या होत्या. मात्र आज नेहा, सोनू आणि टोनी पुन्हा एकत्र दिसल्याने त्यांच्या चाहत्यांना सुखद धक्का बसला आहे. तिन्ही भावंडांचा हा आनंदी अंदाज पाहून जुने मतभेद मागे पडल्याचे चित्र दिसत आहे. काही नेटीजन्सनी त्यांच्या पोस्टवर लाईक्सचा वर्षाव केला पण काही जण हैराण झाले असून त्यांनी तशा कमेंट्सही केल्या आहेत.

‘यांचं तर ब्रेकअप झालं होतं ना ?’ असा सवाल एकाने विचारला. तर ‘हिने तर कझिन्ससोबत डिव्होर्स घेतला होता ना?’ असा टोमणाही एका युजरने कमेंट्समधून मारला. मात्र या कमेंट्सपेक्षा नेहा, सोनू आणि टोनी यांचा एकत्रित फोटोच अधिक चर्चेत आहे.
Leave a Reply