
नांदेड शहरातील फुले मार्केट परिसरात स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या कथित देहव्यापाराच्या व्यवसायाचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने कारवाई करत सात महिलांची सुटका केली. ‘वेलनेस स्पा सेंटर’च्या नावाखाली हे केंद्र चालवले जात असल्याचे पोलिसांच्या कारवाईत समोर आले आहे.
पोलिसांनी कारवाईपूर्वी डमी ग्राहक पाठवून या प्रकरणाची खातरजमा केली. डमी ग्राहकाकडून इशारा मिळताच LCB पथकाने स्पा सेंटरवर तातडीने छापा टाकला. या कारवाईत नेपाळ, नागालँड, नवी दिल्ली, ठाणे आणि पुणे येथील सात महिलांची सुटका करण्यात आली. मसाजच्या नावाखाली महिलांना स्पा सेंटरमध्ये ठेवून कथितरीत्या देहव्यापारासाठी भाग पाडले जात असल्याचे तपासात समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले.
या छाप्यात पोलिसांनी तीन पुरुषांना अटक केली आहे. आसाम येथील हीफझुर रहेमान, रहाज उद्दिन आणि याहीया अहेमद यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या कारवाईत जवळपास पावणे दोन लाख रुपयांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, स्पा सेंटरचा मालक संतोष बघे हा अद्याप फरार असून, पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे.
या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध अधिनियमासह विविध कलमांनुसार कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, अशा केंद्रांमध्ये परराज्यातील महिलांना विविध प्रकारची आमिषे दाखवून आणले जाते आणि त्यानंतर त्यांना कथितरीत्या अवैध व्यवसायात गुंतवले जाते.
दरम्यान, सुटका करण्यात आलेल्या सात महिलांची चौकशी सुरू असून, तपासादरम्यान या प्रकरणातील आणखी काही बाबी समोर येण्याची शक्यता आहे. या कारवाईमुळे नांदेड शहरातील स्पा आणि मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या कथित अवैध व्यवसायांकडे पुन्हा एकदा लक्ष वेधले गेले आहे. अशा संशयास्पद केंद्रांबाबत माहिती मिळाल्यास नागरिकांनी तातडीने पोलिसांना कळवावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
Leave a Reply