
मुंबई आणि पुण्याला जोडणारी लाईफलाईन म्हणजेच मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर (Expressway) आजपासून दोन दिवसांचा मोठा ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (MSRDC) सुरू असलेल्या पुलाच्या तांत्रिक कामासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आज भर दुपारी ३ तास महामार्ग बंद राहणार आहे. एकीकडे उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळे पर्यटकांची गर्दी वाढत असतानाच दुसरीकडे हा ब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा विचार करावा लागणार आहे.
नेमके कारण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, डोंगरगाव आणि कुसगाव दरम्यान असलेल्या पुलावर दुरुस्ती आणि रंगकामाची अत्यंत महत्त्वाची कामे शिल्लक आहेत. यापूर्वी पुलाच्या बांधकामासाठी काही तात्पुरते लोखंडी सांगाडे उभारले होते, ते हटवण्यासाठी मोठ्या हायड्रा क्रेनचा वापर करावा लागणार आहे. महामार्गावर धावत्या वाहतुकीत हे काम करणे अत्यंत धोकादायक आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी वाहतूक पूर्णपणे थांबवून हे काम पूर्ण केले जाणार आहे.
ब्लॉकची वेळ आणि वाहतुकीचे नियोजन
गुरुवार, २३ एप्रिल २०२६ (मुंबईकडे जाणारी वाहतूक)
- वेळ: दुपारी १२:०० ते दुपारी ३:०० पर्यंत.
- पुण्याकडून मुंबईकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने या ३ तासांसाठी रोखली जातील.
- मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांना सोमाटणे फाटा, किवळे आणि देहूरोड मार्गे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ (जुना मुंबई-पुणे रस्ता) वर वळवण्यात येईल. ही वाहने जुन्या महामार्गावरून प्रवास करून पुढे कुसगाव टोल प्लाझा येथून पुन्हा एक्स्प्रेस वेवर चढू शकतील.
शुक्रवार, २४ एप्रिल २०२६ (पुण्याकडे जाणारी वाहतूक)
- वेळ: दुपारी १२:०० ते दुपारी ३:०० पर्यंत.
- मुंबईकडून पुण्याकडे जाणारी सर्व वाहने बंद राहतील.
- पुण्याकडे जाणारी वाहने कुसगाव टोल प्लाझामार्गे जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर (NH-48) वळवली जातील. ही वाहने देहूरोड आणि किवळे मार्गे पुन्हा पुण्याकडे जाऊ शकतील.
प्रवाशांच्या अडचणी आणि उपाययोजना
सध्या उन्हाळा तीव्र आहे. अशा परिस्थितीत भरदुपारी घेतलेल्या या ब्लॉकमुळे प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेषतः खासगी वाहने आणि लक्झरी बसमधील प्रवाशांना या बदलाचा मोठा फटका बसू शकतो. तसेच प्रवासादरम्यान काही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास किंवा मदतीची गरज भासल्यास ९८२२४९८२२४ (MSRDC नियंत्रण कक्ष) किंवा ९८३३४९८३३४ (महामार्ग पोलीस) या क्रमांकांवर तातडीने संपर्क साधता येईल. प्रवाशांनी या ३ तासांच्या काळात शक्य असल्यास आपला प्रवास पुढे ढकलावा किंवा नियोजित वेळेच्या किमान २ तास आधी घरून निघावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
पुढील प्रवासासाठी लक्षात ठेवा
ज्या वाहनचालकांना वेळेचे बंधन आहे, त्यांनी ब्लॉकच्या वेळेत एक्स्प्रेस वेऐवजी सुरुवातीपासूनच जुन्या मुंबई-पुणे महामार्गाचा वापर करणे हिताचे ठरेल. जरी हा मार्ग वेळखाऊ असला, तरी ब्लॉकमुळे होणाऱ्या ट्रॅफिक जॅममधून यामुळे सुटका होऊ शकते.
Leave a Reply